सांगली : बांगला देशातील अल्पवयीन मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेसह दोघांना सांगली पोलीसांनी अटक केली. यातील एका संशयिताला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरपारा गावातून अटक करण्यात आली.
काही दिवसापुर्वी मिरजेत राहणाऱ्या रुपा उर्फ सपना अबुलकाशीम शेख या महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीवेळी ती महिला बांगला देशातील असल्याची व कालू नावाच्या मध्यस्तामार्फत मुलीला आणल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे मध्यस्थ कालू उर्फ खालीक रियाजुद्दीन मंडल याला अटक करण्यात आली. या दोघा विरुध्द मानवी तस्करी केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>‘आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका’, गोपीचंद पडळकरांचा तुफान डान्स; VIDEO व्हायरल
ही कारवाई निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उप निरीक्षक पंकज मोरे, हवालदार संजय कांबळे, प्रकाश पाटील, इम्रान मुल्ला, अनिता गायकवाड, प्रतिक्षा गुरव आदींच्या पथकाने केली.