Nanded child murder : निवडणुकीत उमेदवारी मिळावी, आपल्या प्रभागातून/मतदारसंघातून निवडून यावं अशी प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते. त्यामुळे जमेल त्या पद्धतीने कायद्यातील पळवाटा शोधून या निवडणुका लढल्या जातात. अनेकदा विरोधातील उमेदवारांच्या हत्याही केल्या जातात. पण निवडणुकीत उभं राहता यावं म्हणून स्वतःच्याच पोटच्या मुलीची हत्या केल्याचं कधी कोणी ऐकलं नसेल. पण अशी धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
उमेदवारी मिळावी म्हणून मुलीची हत्या
पांडुरंग कोंडमांगले या २८ वर्षीय तरुणाने त्याच्या जुळ्या मुलांपैकी मोठ्या मुलीची हत्या केली. जून महिन्यात तिथे पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र पंचायत राज नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळत नाही. पांडुरंग कोंडमांगलेला ३ वर्षांचा एक मुलगा आणि सहा वर्षांच्या दोन जुळ्या मुली आहेत.
जूनमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत पांडुरंगला उमेदवारी हवी होती. पण महाराष्ट्र पंचायत राज समितीच्या अपत्याच्या नियमात तो बसत नव्हता. यासंदर्भात त्याने त्याच्या गावचा सरपंच गणेश शिंदे याच्याशी चर्चा केली. ते दोघेही चांगले मित्र आहेत. गणेश शिंदेनेच त्याला पांडुरंगच्या जुळ्या मुलींपैकी मोठी असलेली प्राचीची हत्या करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती निजामाबाद पोलिसांनी दिली.
प्राचीला दत्तक घेतलं असल्याचं सुरुवातीला ते दाखवणार होते. पण प्राचीच्या जन्म प्रमाणपत्रात पांडुरंगचं नाव पिता म्हणून असल्याने ते कायदेशीर अडचणीत सापडले असते. त्यानंतर, या दोघांनी तिला बाहेर लांब सोडून देण्याचा विचार केला. पण प्राची पुन्हा आपल्या गावी परतण्याची शक्यता होती. त्यामुळे हे दोन्ही नियोजन त्यांचं फसले. त्यामुळे या दोघांनी तिला मारण्याचा कट रचला.
प्राचीची हत्या कशी केली?
पांडूरंगने प्राचीला निजामाबाद येथे फिरायला नेले. निजामाबाद त्याच्या गावापासून काही किलोमीटर लांब आहे. सुरुवातीला याचा कोणालाही संशय आला नाही. निजामाबाद येथील निजामसागर कालव्याजवळ पांडुरंगने प्राचीला दुचाकीने आणलं. या कालव्याजवळ आजूबाजूला भरपूर शेती आहे. पांडूरंगने या कालव्यात प्राचीला फेकून दिलं आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. पण शेतात काम करणाऱ्या कामगारांना कसला तरी आवाज आला. त्यामुळे त्यांनी लागलीच जाऊन कालव्यात पाहिलं. तिथे एका लहान मुलीचा मृतदेह तरंगताना त्यांना दिसला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी तत्काळ येत मृतदेह बाहेर काढला. या मृतदेहाचे फोटो लागलीच सगळीकडे पाठवण्यात आले. सोशल मिडिया, व्हॉट्सअॅप आणि वर्तमानपत्रात याविषयी माहिती देण्यात आली. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हॉट्सअॅपवरील एक फोटो महाराष्ट्रातील एका गावातील व्यक्तीने पाहिले. त्याने प्राचीला ओळखलं. तसंच, याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी तीन पथके तैनात केली होती. त्यापैकी एक टीम नांदेडच्या केरूर गावात पोहोचले आणि प्राचीच्या पित्याला ताब्यात घेतले, असंही पोलिसांनी सांगितलं.
पांडुरंगने सुरुवातीला प्राचीला दवाखान्यात दाखल केल्याचं सांगितलं. पण कोणत्या दवाखान्यात दाखल केलं हे सांगायला तो तयार नव्हता. शेवटी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने त्याच्याकडून संपूर्ण माहिती काढून घेतली. तेव्हा त्याने या संपूर्ण घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी पांडूरंगला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर, त्याला मदत करणाऱ्या गणेश शिंदेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

