scorecardresearch

प्रीसिजन संगीत महोत्सवात दोन दिवस सोलापूरकरांना मेजवानी

प्रीसिजन फाउंडेशनच्यावतीने येत्या २३ आणि २४ एप्रिल रोजी ‘प्रीसिजन संगीत महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर : प्रीसिजन फाउंडेशनच्यावतीने येत्या २३ आणि २४ एप्रिल रोजी ‘प्रीसिजन संगीत महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे. संतूरवादक पं. दिलीप काळे, शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेऊंडी, पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सहभागासह महिला कलावंतांचा सतार, गायन आणि कथक असा त्रिवेणी संगम असलेल्या मैफिलीचे आयोजन हे यंदाच्या संगीत महोत्सवाचे वैशिष्टय़ राहणार आहे.

मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रीसिजन संगीत महोत्सवास सोलापूरकर रसिक मुकले होते. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष असून हुतात्मा स्मृति मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रीसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रीसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष यतीन शहा उपस्थित होते.

संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या,की या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी २३ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात प्रख्यात संतूर वादक पं. दिलीप काळे यांचे संतूर वादन होईल. त्यांना तबल्यावर रामदास पळसुळे हे साथ करतील. दुसऱ्या सत्रात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना भरत कामत ( तबला ), सुयोग्य कुंडलकर ( हार्मोनियम), प्रसाद जोशी ( पखवाज ) आणि नागेश भोसेकर ( तालवाद्य ) यांची साथ असेल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी २४ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात  मोहिनी  या अभिनव संगीत मैफिलीत सहा महिला कलाकार सहभागी होणार आहेत. यात सितार, गायन, कथक यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळेल. सहाना बॅनर्जी (सितार), रुचिरा केदार (गायन), सावनी तळवलकर (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), शीतल कोळवलकर (कथक), अनुजा बरुडे (पखवाज) यांचा सहभाग राहणार आहे. सोलापुरात असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

अंतिम सत्रात किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचे शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन होईल. पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचा स्वराविष्कार अनुभवणे ही रसिकांसाठी पर्वणी असेल. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील, हार्मोनियमवर रवींद्र कातोटी, मनोज भांडवलकर ( पखवाज ) आणि विश्वास कळमकर ( तालवाद्य ) हे साथ करतील.

पुण्यातील सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापुरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशाने प्रीसिजन फाउंडेशन मागील सहा वर्ष पासून प्रयत्नशील आहे. सोलापुरातील रसिकश्रोत्यांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रयत्न आहे. यंदाच्या वर्षीही सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद नि:शुल्क घेता येईल. त्यासाठी नि:शुल्क प्रवेशिका १८ एप्रिलपासून हुतात्मा स्मृति मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उपलब्ध होतील. प्रीसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two day feast people solapur precision music festival ysh

ताज्या बातम्या