लष्करामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरूणांना लुबाडणा-या दोन व्यक्तींना आज जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली. समाधान सखाराम पाटिल आणि संदिप केशव पाटिल अशी आरोपींची नावे असून त्यांना काल (रविवार) अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस निरीक्षक प्रविण पडवळ यांनी दिली. समाधान पाटिल हा २००३ पासून भारतीय लष्कर सेवेमध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहे, असंही ते पुढे म्हणाले.
भारतीय लष्करामध्ये नोकरीचे आमिष दाखवून नियुक्ती अधिका-याच्या नावाखाली या दोघांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि सिन्नर येथील अनेक तरूणांकडून लाखो रूपये उकळले आहेत.
नांदगाव येथील भास्कर धनराज पाटिल, सिन्नर येथील भरत सोनावणे आणि अनिल नरोडे यांना आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला.
देवळाई कॅम्प आर्टीलरी सेंटर येथे मार्च २०-२१ तारखेला घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये संपूर्ण राज्यभरातून एकूण १६०० तरूण सहभागी झाले होते. ज्या तरूणांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी याबाबत नाशिक ग्राम पोलिसांना माहिती पुरविण्याचे आदेश पडवळ यांनी दिले आहेत.