नांदेड : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या किनवट तालुक्यातील दोन महिला तलाठ्यांना  स्थानिक न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. मंगळवारी दुपारनंतर या दोघींना लाच स्वीकारताना किनवट येथे पकडण्यात आले होते.

भाग्यश्री भीमराव तेलंगे आणि सुजाता शंकर गवळे अशी वरील महिला तलाठ्यांची नावे आहेत. भाग्यश्री तेलंगे मागील ११ वर्षांपासून तलाठी पदावर कार्यरत आहे, तर सुजाता गवळे जेमतेम आठ महिन्यांपूर्वीच तलाठीपदी रुजू झाली होती. किनवट तालुक्यातील एका शेतकर्‍याने आपल्या वडिलोपार्जीत ७ एकर शेतीचा अर्धा भाग आपल्या पत्नीच्या नावावर करण्याचे प्रकरण तलाठी कार्यालयात दाखल केले होेते.

या कामासाठी भाग्यश्री तेलंगे हिने प्रथम ४० हजार रूपयांची मागणी केली. पण १७ हजार रुपयांवर तडजोड झाल्यानंतर संबंधित शेतकर्‍याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या पथकाने मंगळवारी किनवट येथे सापळा रचला होता. भाग्यश्री तेलंगे व सुजाता गवळे या दोघींनी मंगळवारी तक्रारकर्त्याकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या पथकाने दोघींनाही रंगेहाथ पकडून पुढील कारवाई पार पाडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघींविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी त्यांची झडती घेतली असता तेलंगे हिच्याकडे ६ हजार ६२० तर गवळे हिच्याकडे रोख १८ हजार ८२० रुपये आढळून आले. नंतर या दोघींच्या घरांची झडती घेण्यात आली. या दोघींना बुधवारी नांदेड येथे न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर दोघींनाही एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.