अहिल्यानगर: शहरातील कायदा-सुव्यवस्थेला सतत धोका निर्माण करणाऱ्या दोन गुंडांना महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक व्यक्ती अधिनियमाद्वारे (एमपीडीए) स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी दिला आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा गुंडांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत (वय ३२, रा. माणिक चौक, लाटे गल्ली, अहिल्यानगर) आणि प्रताप सुनील भिंगारदिवे (वय २९, रा. सावतानगर, पंपिंग स्टेशन, अहिल्यानगर) अशी कारवाई केलेल्या सराइतांची नावे आहेत. बंटी राऊतविरुद्ध कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात दरोडा, अत्याचार, घरात घुसून स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, जीवघेणा हल्ला, गावठी कट्टा बाळगणे आदी १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी, ‘एमपीडीए’अंतर्गत प्रस्ताव पाठवला होता.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रताप भिंगारदिवेविरुद्ध शस्त्रांसह हल्ला, अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन, धमकावणे आदी ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृत्यांमुळे भिंगारमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्याच्यावरील प्रतिबंधक उपाययोजना निष्फळ ठरल्याने सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला होता.
दोन्ही प्रस्तावांची जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी छाननी करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे शिफारस केली होती.