महाडच्या आंबेडकर महाविद्यालयातील प्रकार: प्राचार्य-प्रभारी प्राचार्यासह सहा जखमी; चौघे अटकेत

अलिबाग : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून गुरुवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यात प्राचार्य-प्रभारी प्राचार्य यांच्यासह सहा जण जखमी झाले. या प्रकरणी प्राचार्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली.

गेल्या पाच वर्षांपासून महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्यपदावरून वाद सुरू आहे. २०१४ मध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आपले निलंबन बेकायदा असल्याचा दावा करीत त्यांनी पुन्हा प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. महाविद्यालय प्रशासनाकडून मात्र महाविद्यालयातील ग्रंथपाल सुरेश आठवले यांची प्रभारी प्राचार्यपदी नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून आठवले आणि गुरव यांच्यात प्राचार्यपदावरून वाद सुरू होता.

गेल्या शुक्रवारी डॉ. धनाजी गुरव हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत आठवले यांनी प्राचार्याच्या दालनाचे कुलूप फोडून प्राचार्यपदाचा ताबा घेतला. डॉ. गुरव हे गुरुवारी सकाळी ७ वाजता आपल्या समर्थकांसह महाविद्यालयात आले आणि त्यांनी प्राचार्याच्या दालनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी या दोघांच्या समर्थकांमध्ये लाठय़ा-काठय़ा, हातोडय़ाने हाणामारी झाली. महाविद्यालयातही तोडफोड करण्यात आली. या हाणामारीत डॉ. धनाजी गुरव, सुरेश आठवले यांच्यासह महेंद्र घारे, अरविंद साळवी, विठ्ठल गायकवाड, संजय हाटे हे जखमी झाले. त्यांच्यावर महाडमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी प्राचार्य गुरव यांच्यासह चौघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसह इतर कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांनी दिली.

पोलीस तैनात

महाविद्यालय परिसरात पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाविद्यालयाशी संबंध नसलेल्यांना महाविद्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संचालक मंडळावरून वाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून हे महाविद्यालय चालविले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या संचालक मंडळावरूनच वाद सुरूअसून, हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच महाविद्यालयाचे अधिकृत प्राचार्य कोण? याचाही निर्णय होऊ  शकलेला नाही.