दुष्काळाचा वन्यजीवांना फटका.. आठवडय़ाला दोन हरणांचा मृत्यू!

दुष्काळाच्या वणव्यात वन क्षेत्राची वाताहत होत असून, पाणी व खाद्याच्या शोधात वन्य प्राणी वन क्षेत्रातून बाहेर पडू लागले आहेत. मात्र, त्यामुळेच सैरभैर होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

दुष्काळाच्या वणव्यात वन क्षेत्राची वाताहत होत असून, पाणी व खाद्याच्या शोधात वन्य प्राणी वन क्षेत्रातून बाहेर पडू लागले आहेत. मात्र, त्यामुळेच सैरभैर होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. राज्यातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या लातूरसारख्या जिल्ह्य़ात अलीकडे दर आठवडय़ागणिक किमान दोन हरणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा सहायक वन संरक्षक जी. एस. साबळे यांनी दिली.
औसा तालुक्यातील नागरसोगा व देवणी शहरालगत गुरुवारी दोन घटनांमध्ये दोन हरणांचा अपघाती मृत्यू झाला. कधी अपघात, तर कधी उपासमारीने या हरणांना मरणाला कवटाळावे लागत आहे. राज्यात मुंबईखालोखाल (०.३८ टक्के) सर्वात कमी वनक्षेत्र लातूर (०.५४ टक्के) जिल्ह्य़ात आहे. चार हजार ८.१४ हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी उपलब्ध गायरान ३,५४४.७९ हेक्टर जमीन हे वनसदृश क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ते वन विभागाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वन विभागाने हे क्षेत्र विकसित केल्यास लातूरचे क्षेत्र १.०२ टक्के होईल. या वर्षी वन विभागाने ३३२ हेक्टर क्षेत्रावर ७ लाख ४१ हजार ६२५ वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पाऊस गायब आहे.
वन विभागाने जिल्हय़ात १२ ठिकाणी नर्सरी विकसित केली. आठ लाख ७२ हजार रोपे वृक्षलागवडीसाठी जपले आहेत. िवधनविहिरीचे पाणी अपुरे पडत असल्यामुळे टँकरने पाणी आणून रोपे जगवली जात आहेत. या वर्षी अवर्षणामुळे वनक्षेत्रही धोक्यात व वन्यजीवही संकटात सापडले आहेत. गावोगावी माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळय़ात भटकंती करावी लागत आहे. पाळीव प्राण्यांसाठी नाना उपद्व्याप करून पाणी उपलब्ध केले जात आहे. मात्र, वन्य प्राण्यांसाठी पाणी उपलब्धच केले जात नाही.
जिल्हाभरात गेल्या काही वर्षांत वन विभागाने ५५० कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठय़ात पावसाळय़ात पाऊस पडल्यानंतर पाणी जमा होऊ शकते. पाणी नसलेल्या वेळेत टँकरने पाणी टाकावे लागते. वन विभागाकडे इतकी मोठी आíथक तरतूद नसल्यामुळे सर्व पाणवठे आता कोरडेठाक आहेत. स्वयंसेवी संस्थांनी या कामात पुढाकार घेतला व थेट पाणवठय़ात टँकरने पाणी टाकण्याचे ठरवले, तर आठवडय़ाला एकदा टँकरने टाकलेले पाणीही पुरेसे होऊ शकते. या कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज जिल्हा सहायक वनसंरक्षक साबळे यांनी व्यक्त केली.
पाच हजार वर्षांचा इतिहास!
पाच हजार वर्षांपूर्वी लातूर परिसरात हत्ती, रानरेडे, वाघ, सिंह असे प्राणी अस्तित्वात होते. रेणापूर तालुक्यातील हारवाडी येथे उत्खननात याचे अवशेष सापडल्याची नोंद दार्शनिकेत आहे. उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील बेटाची आजही हत्तीबेट म्हणून ओळख आहे. त्या काळी पूर्वीच्या लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ांच्या क्षेत्रात ७२ महावने होती. गुलबग्र्याजवळील सौंदत्ती येथे सम्राट अशोकाचे महाप्रधान धर्ममहापात्रा राहत. त्या काळात वाघांची हत्या केली जाऊ नये, असे आदेश त्यांनी दिल्याचीही माहिती उपलब्ध आहे. पर्यावरणीयदृष्टय़ा इतक्या नसíगक साधनसंपत्तीने समृद्ध प्रदेशात कालांतराने पर्यावरणाचा समतोल ढासळत गेला. भूकंपासह अनेक आपत्तींना तोंड देत आज सर्वात कमी वनक्षेत्र असलेला प्रदेश म्हणून या भागाची ओळख आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two hart died in drought

ताज्या बातम्या