तारकर्ली बोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, ७ जखमी

तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली़. 

सावंतवाडी : तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली़.  या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत़. आकाश भास्करराव देशमुख (३०, रा. शास्त्रीनगर, अकोला), डॉ. स्वप्निल मारुती पिसे (४१, आळेफाटा, पुणे) अशी मृतांची नावे आहेत़  रश्मी निशेल कासूल (४५, रा. ऐरोली, नवी मुंबई), यांच्यावर रेडकर हॉस्पिटल येथे, तर संतोष यशवंतराव (३८, बोरिवली, मुंबई) यांच्यावर डॉ. अविनाश झांटय़े हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त मृणाल मनीष यशवंतराव (८), ग्रंथ मनीष यशवंतराव (दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतराव (साडेचार वर्षे, सर्वजण रा. बोरिवली, मुंबई), वैभव रामचंद्र सावंत (४०, रा. वायरी, तारकर्ली) आणि उदय भावे (४० ऐरोली, नवी मुंबई) यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभम गजानन कोरगावकर, शुभांगी गजानन कोरगावकर, शैलेश प्रदीप परब, अश्विनी शैलेश परब, मुग्धा मनीष यशवंतराव, मनीष यशवंतराव, आयुक्ती यशवंतराव, सुशांत अण्णासाहेब धुमाळे, गीतांजली धुमाळे,  प्रियन संदीप राडे आणि सुप्रिया मारुती पिसे यांना प्राथमिक उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी सध्या उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मालवण, तारकर्ली, देवबाग आदी ठिकाणी मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे समुद्रात नौकानयन व अन्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यापैकीच तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने हा अपघात घडला. बोट किनाऱ्याजवळ येत असताना लाटांच्या तडाख्यामुळे हा अपघात झाला. तसेच क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांमुळे लाटांच्या तडाख्याने ती एका बाजूला कलंडली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दरम्यान, या नौकामालकांनी सुरक्षेची काळजी घेतली होती किंवा नाही, याची चौकशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने सुरू केली आहे. सुट्टय़ांच्या काळात येथे काही ठिकाणी अनधिकृत बोटिंगही केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असेही संकेत बगाटे यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two killed seven injured in tarkarli boat accident ysh

Next Story
यंदा वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
फोटो गॅलरी