रोहा तालुक्यातील चणेरा येथे बिबटय़ाची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यात हरिश्चंद्र वाडकर आणि गंगाराम पाटील या दोघांचा समावेश आहे. दोघांनाही २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिबटय़ाचा चोरीला गेलेल्या एका पंजाचा शोध लावण्यात वनविभाग आणि पोलिसांना यश आले आहे.

रोहा तालुक्यातील चणेराजवळ शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासात अडकून बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. या बिबटय़ाचे उजव्या बाजूचे दोन्ही पायाचे पंजे कापून नेण्यात आले होते. त्यामुळे बिबटय़ाची शिकार झाली असण्याचा संशय व्यक्त केला जात होता. विशेष म्हणजे ही घटना फणसाड वन्यजीव अभयारण्यापासून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर घडली होती. त्यामुळे अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला होत्4ाा. वनविभाग आणि पोलीस संयुक्तपणे या घटनेचा तपास करत होते.

याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या कलम १५ व १६ अन्वये गुन्हा दाखल आला. यानंतर या परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर चोरीला गेलेल्या बिबटय़ाच्या दोन पंजांपकी एक पंजाही जप्त करण्यात आला असल्याची माहिती रोह्य़ाचे उपवनसंरक्षक विजय सूर्यवंशी यांनी दिली. या प्रकरणाची वन विभागाने गंभीर दखल घेतली असून उपविभागीय वन अधिकारी विजय सावंत आणि मुरुडचे वनक्षेत्रपाल भोईर या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.