सांगली : भरधाव रेल्वेने धडक दिल्याने दोन माकडांचा गुरुवारी दुपारी बळी गेला, तर एक पिलू गंभीर जखमी झाले. ही घटना मिरजेजवळ इनाम धामणी हद्दीत घडली. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस माकडांचा कळप लोहमार्गावर होता. याचवेळी कोल्हापूरहून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस मिरजेकडे येत होती. धामणीला जाणाऱ्या भुमीगत रस्त्यावरील पुलावर असलेला कळप रेल्वे आल्याने लोहमार्गावरुन धावत सुटला.

या दरम्यान भरधाव रेल्वेची धडक बसल्याने दोन माकडे रुळालगत गंभीर जखमी होऊन पडली, तर एका पिलाची शेपटी तुटून पडली. नागरिकांनी तात्काळ लोहमार्गावर धाव घेतली. त्यावेळी गंभीर अवस्थेतील मादीला पाणी पाजण्यात आले, मात्र फार काळ जिवंत राहू शकली नाही. उपचार करण्यासाठी जखमी पिलाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कळपातील अन्य सदस्यांनी नागरिकांना जवळ येऊ दिले नाही. शेपटी तुटलेल्या स्थितीतच पिलाला सोबत घेऊन माकडांचा कळप पसार झाला. रेल्वे मार्गावर वन्य प्राण्यांचे अपघात झाल्यास तात्काळ नागरिकांनी वनविभागाला माहिती द्यावी असे आवाहन मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील यांनी केले आहे.