साताऱ्यात दोन महिन्यांत तीन हजारांवर मुले करोनाग्रस्त

. जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने निष्पन्न होऊ लागले.

Coronavirus-01
(संग्रहित छायाचित्र)

|| विश्वास पवार

प्रशासनामार्फत जनजागृतीची मोहीम

वाई : साताऱ्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात नऊ हजार तर मागील दोन महिन्यांत ० ते १४ वयोगटातील तीन हजार मुले बाधित झाली आहेत.

सातारा जिल्ह्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मागील दोन महिन्यांत तीन हजारांवर लहान मुले बाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. या लहान मुलांचा करोनापासून बचाव करण्यासाठी जनजागृतीची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. पालकांना जागृत केले जात आहे.

या संसर्गाचा वेग एप्रिल मे महिन्यात सर्वाधिक होता. जिल्ह्यातील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने निष्पन्न होऊ लागले. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या करोना वाढीचा वेग राज्यात इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांवर उपचार, रुग्णालय शोधणे, प्राणवायू, श्वासनयंत्रे, रेमडिसिविर आदींचाही मोठा पेच निर्माण झाला. शहरी भागातील लहान लहान घरांमुळे एका रुग्णाच्या गृहविलगीकरणामुळे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य बाधित झाले. त्याबरोबर लहान मुलेही बाधित होण्याचे प्रमाण वाढले. मागील वर्षभरात हे प्रमाण नगण्य होते. मात्र मार्च-एप्रिल महिन्यात तीन हजारांवर लहान मुले करोनाबाधित आढळून आली. मार्च-एप्रिल महिन्यात ० ते १४ वयोगटातील ३,०२२ मुले बाधित झाली तर मागील वर्षभरात ८, ५८५ मुले बाधित झाली. ही संख्या नक्कीच चिंताजनक आहे. मात्र सातारा जिल्ह्यात लहान मुलांसाठी एकही करोना उपचार केंद्र नाही. त्यामुळे मुलांना इतर रुग्णांबरोबरच उपचार घ्यावे लागतात. शासकीय पातळीवर जिल्हा रुग्णालयात, जम्बो कोविड रुग्णालयात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. साताऱ्यातील एक बाल रुग्णालय उपचारांसाठी अधिग्रहित करण्यात आले असून अन्य एका खाजगी रुग्णालयाने प्रशासनाकडे करोनाबाधित लहान मुलांवर उपचारांची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लहान मुलांवर उपचार करणारी व्यवस्था अपुरी ठरत आहे.

संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याची आवश्यकता आहे. याबाबत तातडीने कार्यवाहीच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत . – श्रीनिवास पाटील, खासदार, सातारा

शून्य ते १४ वयोगटातील मुलांचेही लसीकरण करावे. करोनामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुलांच्याही जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या लसीकरणाची गरज आहे. – स्वाती शेंडे, शिक्षिका व सामाजिक कार्यकत्र्या, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

 

सातारा जिल्हा रुग्णालयात आणि जम्बो कोविड रुग्णालयात मुलांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयात उपचारांसाठी परवानगी दिली आहे.  – डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा

 

करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. लहान मुलांना तत्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आत्तापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. – रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती, विधान परिषद

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two months over three thousand children have been affected akp