लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र सुरू आहे. दोन रुग्णांचा मृत्यू, तर २९ नवे रुग्ण रविवारी आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात ६६ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ११९२ झाली. अकोला जिल्ह्यात गत १६ दिवसांत ३२ करोनाबाधितांचे प्राण गेले आहेत. ३६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. मागील १६ दिवसांत रुग्ण वाढीसोबतच मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले. ६ ते २१ जूनपर्यंत १६ दिवसांत ३२ करोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. दररोज सरासरी दोन रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृत्यूदर झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा हादरला आहे. शनिवारी एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी आणखी दोन रुग्णांचा बळी गेला. जिल्ह्यातील एकूण २२७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १९८ अहवाल नकारात्मक, तर २९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ११९२ वर पोहचली. दरम्यान, नायगाव येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ८ जून रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील ५० वर्षीय महिला रुग्णाचा काल (दि.२०) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १९ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आज दिवसभरात २९ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाच महिला व दहा पुरुष आहे. त्यामध्ये शंकर नगर, गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फैल येथील दोन, तर गीता नगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशीम बायपास, वृंदावन नगर, रामदास पेठ, लाडीज फैल येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील तेरा अहवाल अकोट फैल येथील मनपा नमुने संकलन केंद्रातील आहेत. आज सायंकाळी आणखी १४ रुग्णांची भर पडली. त्यात सात महिला व सात पुरुष आहे. त्यातील अकोट, शंकर नगर व लाडीज फैल येथील प्रत्येकी दोन तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, वाडेगांव, हरिहरपेठ, जुने शहर, कोळंबी महागांव, अशोक नगर, मोचीपुरा आणि लक्ष्मी नगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील सात अहवाल अकोट फैल येथील मनपा नमुने संकलन केंद्रातील आहे.

माजी आमदारांना करोनाची बाधा
शहरातील एका डॉक्टर माजी आमदारांनाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. ते जिल्ह्यातील एका आयुर्वेद महाविद्याालयाचे संस्थाचालक आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. करोना संकटाच्या काळात त्यांनी मास्क व आयुर्वेद काढा वाटपाचे उपक्रम राबविले. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आणखी दहा जणांची करोनावर मात
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७६२ रुग्णांची करोनावर मात केली आहे. करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १० जणांचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.