जिल्ह्यातील कुपोषण, माता व बालमृत्यू चे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबवले जात असतानाच २३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . एका प्रकारात बाळाचा त्याच्या आईच्या पोटात मृत्यू झाल्यानंतर या मातेला वाचवण्याच्या प्रयत्नांना अपयश आले, तर दुसरी गरोदर माता विषारी सापाच्या सर्पदंशाने मृत्यू पावली.

जव्हार तालुक्यातील कायरी येथील रेखा पोटिंदा (२६) या महिले पोटात बाळाच्या हालचाली थांबल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला प्रथम साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलेला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवून नंतर तातडीने नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतर देखील गर्भवती महिलेच्या पोटातील बाळ मृत पावल्याचे आढळून आले, तसेच मध्यरात्रीच्या सुमारास या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला रक्त कमी असण्याचा आजार होता. तसेच प्रसूतिपूर्वी रक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
या महिलेच्या व बालकाचा मृतदेह मूळगावी आणण्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहन मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली होती. अखेर खासगी शववाहिनीतून मृतदेह मूळगावी आणण्यात आला. याप्रकरणी स्थानीय रुग्ण कल्याण निधीमधून वाहनाचे भाडे अदा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात पिंपळशेत येथील २१ वर्षीय गरोदर मातेला विषारी साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही गर्भवती मातामत्यू जव्हार तालुक्यात झाले असून त्यांचा तपास करून याबाबत अहवाल सादर करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.