शाळेत निरोप समारंभासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकींचा विचित्र अपघात होऊन त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. दुचाकींचे हॅण्डल परस्परांमध्ये अडकून हे विद्यार्थी खाली पडले. त्याच वेळी मागून येणाऱ्या मालमोटारीखाली ते सापडले. मुझफ्फर खान व  संकेत ,सज्जनसिंग चंदेल अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. नवजीवन डे स्कूलमध्ये इयत्ता दहावीत ते शिक्षण घेत होते. सकाळी हे दोघे आपल्या मित्रासमवेत दुचाकी घेऊन शाळेत निघाले होते. रस्त्यावर गप्पा मारीत जात असताना त्यांची वाहने जवळ आली आणि काही कळायच्या आत हॅण्डल परस्परांमध्ये अडकली. त्यामुळे मोटारसायकलवरून मुझफ्फर व  सूरज खाली फेकले गेले. या वेळी मागून येणाऱ्या वाळूच्या मालमोटारीखाली ते सापडले. तिसरा मित्र बाजूला फेकला गेल्याने तो बचावला, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली. नगरसेवक तानाजी जायभावे यांनी रुग्णवाहिका बोलावून दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. दरम्यान, नवजीवन डे स्कूलच्या वतीने शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला जाणार होता. त्या कार्यक्रमास हे विद्यार्थी निघाले होते. अपघाताचे वृत्त समजल्यावर शिक्षक व पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.