यवतमाळमध्ये जमावाचा संताप; बंदोबस्तात वाढ

जेथे जेथे दर्डाच्या नावाचे फलक अथवा वास्तू आहे त्या तोडण्याच्या आणि तेथे अन्य नावे देण्याचे आंदोलन सुरू झाल्याने यवतमाळात सर्वत्र फलकांची तोडफोड सुरू आहे. यवतमाळ-दारव्हा मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळील ‘दर्डा नाका’ चौकाला ‘दारव्हा नाका’ असे नाव देण्यात आले आहे. या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

लोहाऱ्याजवळील दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयावरही दगडफेक, तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य प्रवेशकमानसदृश्य प्रवेशव्दारावरील जवाहरलाल दर्डा यांच्या नावाची स्टेनलेस स्टीलची अक्षरे उखडून फेकण्यात आली आहेत. खासदार निधीतून विजय दर्डा यांनी दिलेल्या पशातून उभारलेल्या कामांचे जेथे जेथे फलक आहेत ते सर्व उखडून फेकण्याचा सपाटा संतप्त जमावाने लावला आहे. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल येऊन गेले. शहरात शीघ्र कृती दल तनात आहे. वायपीएसमधील प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाचे अधिकारी आलेले आहेत. महिलांनी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधून ‘तुमचे पोलीस महिलांवर दगडफेक करतात आणि तुम्ही नुसते बघ्याची भूमिका घेत बसता काय’, असा प्रश्न केला आहे. विशेष हे की, किशोर दर्डा यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या दारव्हा नाक्यावरील निवासस्थानी संतप्त महिलांचा जमाव गेला तेव्हा किशोर दर्डांऐवजी त्यांच्या पत्नी सीमा दर्डा समोर आल्या. तुमच्या मुलींच्या बाबतीत असे घडले असते तर?, असा सवाल महिलांनी केला त्यावेळी ‘आमच्या आणि तुमच्या मुलीत फरक आहे’, अशी दर्पोक्तीयुक्त भाषा त्यांनी वापरल्याची माहिती महिलांनी दिली.

वायपीएसमधील घृणास्पद प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाचे अधिकारी आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे पोहोचल्या असून त्यांनी पालकांशी चर्चा केली. याचा अहवाल त्या आयोगाला सादर करणार आहेत. त्या आधारे संस्थाचालकांवर काय कारवाई होते, हाही चर्चेचा विषय आहे. यवतमाळकरांना ‘दर्डा’ या नावाचीच आता अ‍ॅॅलर्जी झाल्याचे दृश्य दिसत असून ‘बोये पेड बबुल के, आम कहाँ से आय’ इथपासून तर ‘भगवान के घर देर है अंधेर नहीं है’ पर्यंतच्या म्हणी समाजमाध्यमातून फिरत आहेत. दर्डा यांच्या दिल्लीतील शासकीय खासदार निवासस्थानावर ‘यवतमाळ भवन’ लिहिलेले आहे ते आणि त्यांच्या संस्थांच्या इमारतींवरील तिरंगा ध्वज काढून टाकण्याचीही मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी

हे प्रकरण दाबण्यासाठी उच्चस्तरीय दबाव येत असल्यानेच विजय दर्डा आणि किशोर दर्डा यांना अटक होत नाही म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांचीच बदली करण्याची मागणी कांॅग्रेसने केली आहे. ज्या बाललंगिक संरक्षण कायद्याअंतर्गत प्राचार्य जेकब दास यांना अटक झाली त्याच कायद्यांतर्गत विजय दर्डा व किशोर दर्डा यांना अटक का होत नाही?, असा संतप्त जनतेचा सवाल आहे. न्याय्य मागण्यांसाठी महिला आंदोलन करतात, त्यांना पोलीस दंडुके दाखवून अडवतात, मात्र आरोपी असलेल्या किशोर दर्डाच्या निवासस्थानी प्रचंड ताफा लावून त्यांना अटक करण्याऐवजी संरक्षण देतात. हा कुठला न्याय, असा प्रश्न अनेक महिलांनी जाहिररीत्या विचारून पोलीस दलाला निरुत्तर केले.