गेल्याच आठवडय़ात करोनामुक्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेले दोघेजण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही रूग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू झाले आहेत.

यापैकी संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील महिला रूग्णाच्या भावाचे काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झाले. त्यानंतर गेल्या २१ एप्रिल रोजी ती आपल्या नऊ  कुटुंबियांसह भावाचे उत्तरकार्य करण्यासाठी बामणोली गावातील सुतारवाडीत आली होती.

त्याबाबतची माहिती ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभागाने या सर्वाना २२ एप्रिल रोजी साडवली येथील मिनाताई ठाकरे विद्यालयातील अलगीकरण कक्षात ठेवले. गेल्या गुरूवारी त्यांचे स्वॅब घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. या महिलेला करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, तरीही तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे बामणोली परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्र सील केले आहे. मारळ आणि खडीकोळवणकडून बामणोलीकडे येणारे रस्ते बंद केले आहेत. ही महिला गावात आल्यानंतर ज्यांच्या संपर्कात आली होती, त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. तसेच ती महिला विलगीकरणात ठेवलेल्या साडवलीतील ठिकाणी एकूण ५६ जण होते. त्याशिवाय आरोग्य विभागाचे ३० पेक्षा अधिक कर्मचारी दिवसरात्र कार्यरत होते. त्या सर्वाचीच आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

चिपळूण तालुक्यातील रुग्ण मुंबईचा

गेले दोन महिने करोनामुक्त असलेल्या चिपळूण तालुक्यातही मुंबईहून आलेल्या व्यक्तीमुळे प्रथमच करोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या  जे .जे. रुग्णालयात अन्य आजारावर उपचार घेऊन ही व्यक्ती २३ एप्रिल रोजी गावात आली होती. जे. जे. रुग्णालयात त्याची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर संबंधित व्यक्तीला घरीच विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु ती व्यक्ती कुटुंबातील अन्य दोघांना घेऊन गावी आली.

आरोग्य विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर त्याला पेढांबे येथे विलगीकरण करुन तपासणीसाठी पाठवलेल्या  नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या आईलाही रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ३३ वर्षांचा हा तरूण मुंबईच्या काळाचौकी परिसरात राहत असून एका खासगी कंपनीत चालक म्हणून कामाला आहे