महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे आणि येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. यावरून राजकीय श्रेय घेण्यास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे राजकीय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचा दावा भाजपा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. निकालाच्या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशी राणी पुतळ्याजवळ भाजपाच्या ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. हा जल्लोष सुरु असतांना त्या भागातून जाणाऱ्या दोन सर्वसामान्य महिलांनी महागाई, रोजगार याबाबत आपल्या भावना व्यक्त करत भाजपाला या प्रश्नांबाबत जाब विचारला. आम्ही आजपर्यंत भाजपला मतदान करत आलो असून यापुढे भाजपला मतदान करणार नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्या महिलांनी सुनावले. त्यावर उपस्थित भाजपचे पदाधिकारी निरुत्तर झाल्याचे बघायला मिळाले.

भाजपाचा जल्लोष सुरु असतांना बालगंधर्व रंगमंदिर परिसरात विद्या वाघ नावाची एक महिला तिच्या सहकारीसह तिथून जात होत्या. भाजपाचाचे कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचे बघितल्यावर संबंधित महिलेने नेमके कारण विचारले. तेव्हा राजकिय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने जल्लोष साजरा करत असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले. तेव्हा या उत्तरावर विद्या वाघ या महिलेने प्रश्नांता भडिमार केला. “तुम्ही पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये कमी केले. पण एवढ्याने दर कमी करून काही होणार आहे का ? दुसर्‍या बाजूला हेल्मेट सक्ती केली जाते.हेल्मेट न घातल्यास दंड आकारला जातो.आम्ही हेल्मेट का घालायचे ? आता तर अन्न धान्यावरही जीएसटी आकारण्यात आला आहे, आता काय अन्न धान्य लांबूनच पाहायचे का ? त्यामुळे आम्ही कसे जगायचे,तुम्हीच सांगा, इकडे दोन रुपयांनी कमी करायचे आणि तिकडे गॅसवर २०० रुपयांनी वाढवायचे हेच आजवरच्या सरकारने केले आहे. सरकार वाढती महागाई, रोजगार यावर बोलत नाही. माझे सासरे स्वातंत्र्य सैनिक असून देखील माझ्या मुलाला आज रोजगार नाही. त्यावर देखील हे सरकार बोलण्यास तयार नाही” अशी प्रतिक्रिया संबंधित महिलेने यावर दिली. महिलांच्या या प्रश्नावर ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष योगेश पिंगळे हे निरुत्तर झाल्याचे बघायला मिळाले. आजवर आम्ही भाजपला मतदान करीत आलो होतो,आता यापुढे भाजपला मतदान करणार नसल्याचेही या महिलांनी बोलून दाखवले.

दरम्यान या महिला काँग्रेस,राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याचे दिसत आहे अशी प्रतिक्रिया योगेश पिंगळे यांनी यावेळी दिली.