केबीसी घोटाळा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिला संशयितांची शनिवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
या घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असून, शनिवारी तक्रारींचा आकडा अडीच हजारांवर गेला. या अर्जावरून फसवणुकीची रक्कम ८० कोटी रुपयांत  पोहोचली आहे. मुख्य संशयित भाऊसाहेब आणि पत्नी आरती चव्हाण यांचा ठावठिकाणा मात्र अद्याप तपास यंत्रणेला लागलेला नाही.
या प्रकरणी आरती चव्हाणची बहीण भारती शिलेदार व भावाची पत्नी कौसल्या जगताप यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ात या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून तक्रारदारांची रांग लागली आहे. शनिवारी तक्रारींची संख्या २५०० पर्यंत जाऊन फसवणुकीची रक्कम अंदाजे ८० कोटींवर गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनील पवार यांनी दिली.