रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात तोतया पोलिसांनी दोन महिलांची १ लाख ४० हजार २०० रूपयांची फसवणूक केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांकडून सर्व नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,रत्नागिरी शहरातील अलहमद पार्क, ८० फुटी हायवेजवळ फिर्यादी रशिदा रशीद साखरकर (वय ७०) रा. नाईक फॅक्टरीसमोर, मांडवी, रत्नागिरी या आपल्या नातीसाठी औषध घेऊन घरी जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यासमोर येऊन स्वतःला पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील ७० हजार २०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
यामध्ये १० हजार रोख रक्कम, ६० हजार रुपये किमतीचे १४ ग्रॅम सोन्याचे दागिने, १०० रुपये किमतीची पिवळ्या धातूची नकली माळ आणि ११० रुपये किमतीच्या पिवळ्या धातूच्या नकली बांगड्या यांचा समावेश आहे. ही घटना रात्री उशिरा रत्नागिरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. त्यानंतर गुन्हा क्रमांक १३६/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१९(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर काही तासातच हातखंबा तिठा ते खेडशी रस्त्यावर, हॉटेल सिद्धाईजवळ अशिता बळीराम म्हापुस्कर (वय ८९ ) रा. हातखंबा, नागपूर पेठ, रत्नागिरी या आपल्या नातीसह दुचाकीवरून डॉ. मुकादम हॉस्पिटल, खेडशी येथे जात होत्या.
यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून फिर्यादींना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यांनी रस्त्यावर चोऱ्या सुरू आहेत, तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ पर्समध्ये ठेवा, असे सांगून म्हापुस्कर यांची फसवणूक केली. यावेळी आरोपींनी कागदाच्या पुडीत नकली चैन ठेवून फिर्यादींची ७० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ लंपास केली. ही घटना रात्री ९ वाजता पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ६४/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१९(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. रत्नागिरी शहर भागात अशा तोतया पोलिसांकडून होणारे फसवणूकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.