Sanjay Raut on Parbhani Mayor Post: परभणी मनपाच्या महौपारपदी शिवसेनेच्या (ठाकरे) सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची निवड नुकतीच करण्यात आली. तर उपमहापौरपदी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड झाली होती. शिवसेनेने (ठाकरे) मुस्लीम महापौर बसविल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. “२०१९ ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला”, अशी टीका शिंदे यांनी केली होती. यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

निष्ठावान मुसलमान परवडला

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “परभणीत भाजपाचे १२ नगरसेवक मुस्लीम आहेत. हे एकनाथ शिंदेंना माहीत आहे का? इतर ठिकाणीही असंख्य मुस्लीम नगरसेवक आहेत. या राज्यात मराठी भाषिक मुस्लीम आहेत. ते काही घुसखोर नाहीत. आमचे अनेक पदाधिकारी मुस्लीम असून ते वर्षानुवर्ष काम करत आहेत. ते मुस्लीम आहेत, म्हणून त्यांना पदापासून दूर ठेवणार का? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलवान परवडला.”

“महापौर सय्यद इकबाल खाजा हे अनेक वर्षांपासून आमचे निष्ठावान कार्यकर्ते आणि तालुका प्रमुख आहेत. त्यांना जर परभणीत महापौर केले तर गद्दारांच्या पोटात दुखणारच. तुम्ही मुस्लीम समाजाला कधी तिकीट दिले नाही का? भाजपानेही मुस्लीम उमेदवारांना तिकीटे दिलेली आहेत. या देशात सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात मुस्लीम व्यक्ती न्यायाधीश होतात. राज्यपाल मुस्लीम होतात, भाजपाने अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पद दिले होते. हे एकनाथ शिंदे आम्हाला काय सांगणार?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भाजपानेही मुस्लीम महापौर केला असता

भाजपाला जर महापौर बनविण्याची संधी मिळाली असती तर त्यांच्या १२ मुस्लीम नगरसेवकांपैकीच एक महापौर झाला असता, हे लक्षात ठेवा असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. या देशामध्ये हिंदू-मुस्लीम करण्यापलीकडे यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही.

परभणी महापालिकेतील एकूण ६५ जागा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २५ जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यांना ११ जागांवरच समाधान मानावे लागले आहे, तर भाजपाच्या पदरात केवळ १२ जागा पडल्या. १ जागा इतर पक्षाला तर ४ अपक्ष निवडून आले आहेत.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

२०१९ साली त्यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, त्यामुळे आम्हाला सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. राज्याचा विकास आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये आम्हाला कौल दिला आहे. २०१९ ला त्यांनी जी भूमिका घेतली आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.