scorecardresearch

Budget 2023 : राज्याला काय मिळालं? म्हणणाऱ्या विरोधकांवर उदय सामंतांचे टीकास्र, म्हणाले “मी आतापर्यंत…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केला.

uday samant and budget 2023
उदय सामंत, निर्मला सीतारामन (फोटो- लोकसत्ताग ग्राफिक्स टीम)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले, तर विरोधकांकडून या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, असा आरोप केला जात आहे. त्यावरच शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पाची स्तुती केल्यास वेगवेगळ्या चर्चेला उधाण येईल, शंका उपस्थित केली जाईल म्हणून या अर्थसंकल्पावर टीका केली जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे, असे उदय सामंत म्हणाले आहेत. ते आज (१ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >> किरीट सोमय्यांचे नाव घेताच संजय राऊत संतापले, म्हणाले “तो माणूस हलकट…”

“मी आतापर्यंत चार वेळा आमदार झालो आहे. प्रत्येक वेळी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळाले, हीच प्रतिक्रिया दिली जाते. त्यामुळे हा आरोप केला जात असेल तर फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अर्थसंकल्पाची स्तुती केल्यास संशय निर्माण होईल, त्यामुळे विरोध करणे ही प्रथा आहे. राज्याला केंद्रबिंदू मसजून टीका-टिप्पणी करण्यापेक्षा देशाला समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे,” असे उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा >>> डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्टअप्सना प्रोत्साहन अन् बरंच काही; अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी काय तरतूद? जाणून घ्या

“या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेत ६६ टक्क्यांची आर्थिक वाढ देण्यात आली आहे. त्यासाठी ८० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नर्सिंग कॉलेज उभारण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुसूचित जातींसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. साक्षरतेसाठी एनजीओंमार्फत काम करण्यात येणार आहे. हे सर्व सामान्यांचे निर्णय आहेत. सामान्यांना केंद्रबिंद माणून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे,” असेही उदय सामंत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 14:53 IST
ताज्या बातम्या