मुंबई : दावोस येथे २०२२ ते २०२५ दरम्यान झालेल्या करारांबाबत लवकरच ‘भगवी पत्रिका’ मांडली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. यामध्ये करारांची अंमलबजावणी, किती प्रकल्प कार्यान्वित झाले, किती प्रक्रियेत आहेत आणि कोणते प्रकल्प मागे आहेत याचा तपशील दिला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत बुधवारी २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते. दावोसमध्ये झालेल्या करारावर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी भगवी पत्रिका सादर केली जाईल. २०२२ मधील सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या एमओयूंपैकी ९८ टक्के अंमलबजावणी झाली. २०२३ मध्ये १,३७,००० कोटींचे करार झाले; त्यापैकी ८० टक्के अंमलात आले. २०२४ मध्ये ३,१६,७३९ कोटींच्या करारांपैकी ७० टक्के अंमलबजावणी झाली. २०२५ मध्ये १२,२३,०८१ कोटींचे करार झाले असून त्यापैकी ८८ टक्के अंमलबजावणी झाली आहे. या वर्षी ३१ लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आले असून त्यात उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा समावेश आहे, असे सामंत यांनी सांगितले.

परकिय गुंतवणूकीसाठी प्रयत्न सुरुच

बल्क ड्रग पार्क प्रकल्प रायगडमध्ये उभारला जात असून त्यासाठी १००० हेक्टर जमीन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. उद्योगवृद्धीसाठी राज्याने १२ नवीन धोरणे जाहीर केली असून औद्योगिक धोरण, जीसीसी धोरण, रत्न व दागिने धोरण, बांबू धोरण आदींचा समावेश आहे. कौशल्य विकासासाठी रतन टाटा यांच्या नावाने पाच कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यासाठी शेकडो कोटींची गुंतवणूक केली जात आहे. जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दावोस सारख्या मंचांवर सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या औद्योगिक वाढीसाठी आणि परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी हे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.