शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेत घेत थेट विधानपरिषदेचं उपसभापती केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडींमुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सचिन अहिर यांनी देखील याबाबत नुकतंच सूचक वक्तव्य केलं होतं. सचिन अहिर यांना वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, “एकनाथ शिंदे माझ्यावर जी जबाबदारी टाकतील, ती पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.” दरम्यान, आता शिंदे सेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनीही वरळीवरून थेट ठाकरेंना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ‘वरळी कोणाची हे २०२९ मध्ये कळेल’, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

सचिन अहिर तुमच्या सेनेत आल्यामुळे तुमच्या पक्षातील अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर उदय सामंत म्हणाले की, “आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. उलट आमचे विधानपरिषदेचे आमदार आहेत, त्या आमदारांनी सचिन अहिर यांच्यासारखा एक कामगार नेता, गिरणी कामगारांचा नेता आणि सर्वसामान्यांचा नेता उपसभापती झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. पण आमच्या पक्षात काही जण नाराज झाले या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

ठाकरेंना अप्रत्यक्ष इशारा

मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, “आता वरळी कोणाची? हे २०२९ ला कळेल. मुंबई कोणाची हे महापालिकेच्या निवडणुकीत कळलं. आता वरळी कोणाची हे २०२९ ला कळेल.”

वरळीबाबत सचिन अहिर यांचे मोठे संकेत

दरम्यान, २०१९ साली सचिन अहिर यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत (संयुक्त) प्रवेश केला होता. त्यांची पांरपरिक वरळी विधानसभेच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना तिकीट दिलं गेलं होतं आणि कालांतराने सचिन अहिर विधानपरिषदेत पोहोचले. त्यांची विधानपरिषदेची मुदत काही काळाने संपत आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळीतून लढले होते. सुनील शिंदे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच सचिन अहिर यांनीही मदत करावी, अशी गळ घालण्यात आली. आदित्य ठाकरे हे वरळीतून २०१९ मध्ये पहिल्यांदा विजयी झाले. आदित्य ठाकरे यांना भविष्यात त्रास होऊ नये या उद्देशानेच ‘मातोश्री’कडून सचिन अहिर व सुनील शिंदे या दोघांना विधानपरिषदेची आमदारकी दिली होती.

दरम्यान, आता सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवरच एका पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा सचिन अहिर यांनी देखील मोठे संकेत दिले होते. “एकनाथ शिंदे माझ्यावर जी जी जबाबदारी टाकतील, ती पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार”, असं सचिन अहिर यांनी म्हटलं होतं.