uday samant mocks uddhav thackeray on shinde group guwahati visit | Loksatta

“मी कुठेतरी वाचलंय, रेडा हे…”, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही वाघ होतो!”

उदय सामंत म्हणतात, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार ‘वाघ’ होतो. उठाव केल्यानंतर आम्ही…!”

“मी कुठेतरी वाचलंय, रेडा हे…”, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “पाच महिन्यांपूर्वी आम्ही वाघ होतो!”
उदय सामंत यांचं उद्धव ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर!

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये शिंदे गटावर टीकास्र सोडलं. शिंदे गटातील बंडखोर आमदारांना ठाकरे गटाकडून सातत्याने रेड्याची उपमा दिली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात यावरून जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना त्यांची चिडचिड होत असल्याचा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात बोलताना शिंदे गटातील आमदारांचा ‘रेडे’ म्हणून उल्लेख केला होता. “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. “तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही”, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं.

एकनाथ शिंदेंनीही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक टीका केली. “त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय. मला वाटत होतं की नैराश्य यायला त्यांना फार वेळ लागेल. पण ते आधीच आलं आहे”, असं एकनाथ शिंदे गुवाहाटी विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“त्यांची मानसिकता ढळली आहे, नैराश्यातून…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; ‘कंटेनरभरून खोक्यां’चा केला उल्लेख!

उदय सामंतांचं खोचक ट्वीट

दरम्यान, उदय सामंत यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार ‘वाघ’ होतो. आम्ही उठाव केला.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही ‘रेडा’ झालो. किती ती चिडचिड? मी कुठंतरी वाचलंय ‘रेडा हे यमाचं वाहन आहे”, असं खोचक ट्वीट उदय सामंत यांनी केलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 13:43 IST
Next Story
‘महाराष्ट्र सरकार आम्हाला कोणतीच सुविधा देत नाही’; सांगलीतील जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी