आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीच नवीन जबाबदारी दिली नाही. पवारांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना पक्षात डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण अजित पवारांच्या मनात डावलल्याची भावना नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिली. शिवाय संबंधित निर्णय पक्षातील सहकार्यांशी चर्चा करून घेतला होता, असं स्पष्टीकरण स्वत: शरद पवार यांनी दिलं आहे. हेही वाचा- सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले… अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही अलबेल नाहीये. मविआचे अनेक नेते एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, असं विधान सामंतांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हेही वाचा- नवीन नियुक्त्या करत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले? संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले… अजित पवारांना डावलल्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल का? असं विचारलं असता उदय सामंत म्हणाले, "अजित पवारांना डावलण्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल की नाही? हे मला माहीत नाही. पण महाविकास आघाडीत सर्वकाही अलबेल नाही. अनेकजण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत, याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. या राजकीय घडामोडींचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. ते पूर्वीपासूनच संपर्कात आहेत. महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' ही फक्त लोकांना दाखवण्यासाठीच होती, यावर अजित पवारांनीच भाष्य केलं आहे. त्यामुळे मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये काहीही अलबेल नाही."