Operation Tiger: राज्यात गाजत असलेल्या ऑपरेशन टायगरबाबत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सविस्तर भाष्य केले आहे. या ऑपरेशनचे शिल्पकार कोण आहेत? बंडखोर खासदारांना कुठे ठेवण्यात आले आहे? ऑपरेशन यशस्वी झाले आहे का? यासह संजय राऊतांची तुडवाची भाषा आणि खासदारांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेवर सामंत उघडपणे बोलले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सामंतांनी ऑपरेशन टायगरशी निगडीत विविध प्रश्नावर खुलासा केला.
ऑपरेशन टायगर यशस्वी झाले का?
“ऑपरेशन टायगर यशस्वी होईल”, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. “ऑपरेशन यशस्वी झालं असं म्हणण्यापेक्षा ते यशस्वी होईल, कारण शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे आणि ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, मुख्यमंत्री असताना त्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल एक वेगळं आकर्षण सर्वच पक्षांमध्ये आहे. खासदारांचे ऑपरेशन टायगर होण्यापूर्वी अनेक आमदार, नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. दिल्लीत उबाठा गटाच्या झालेल्या बैठकीला काही खासदार पोहोचले नाहीत, त्यामुळे ऑपरेशन टायगर हे काही कालावधीत यशस्वी होईल”, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
बंडखोर खासदार कुठे आहेत?
सर्व बंडखोर खासदार दिल्लीत असल्याचा खुलासा सामंत यांनी केला. तसेच, “आम्ही गुवाहटीला गेलो त्यावेळी कोथळा बाहेर काढण्याची भाषा वापरण्यात आली आता तुडवा अशी भाषा वापरली जातेय, हे सर्व महाराष्ट्राच्या लक्षात येतंय”, असाही अप्रत्यक्ष निशाणा सामंत यांनी संजय राऊतांवर साधला. त्यांच्यावर पक्ष बुडवा अशी परिस्थिती असल्याची टीकाही सामंतांनी केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने खासदारांनी कालच्या उबाठाच्या बैठकीला दांडी मारली तसेच, ते सर्व दिल्लीतच असून, त्यांना कुठेही इतरत्र ठेवले नसल्याचा खुलासा सामंतांनी केला.
ऑपरेशन टायगरचे शिल्पकार कोण?
ऑपरेशन टायगरचे शिल्पकार कोण आहेत? या प्रश्नावर बोलताना उदय सामंत यांनी ऑपरेशन यशस्वी झाले तर ते सर्व खासदारच याचे शिल्पकार असतील, असे सांगितले. “जे नेतृत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अडीअडचणीत मदत केली पाहिजे, खासदार म्हणून मार्गदर्शन केले पाहिजे, ते मिळत नसल्याने खासदारांनी हा निर्णय घेतला असावा”, असे मंत्री सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे खासदारांच्या जवळचे असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले. ऑपरेशनची अधिकृत घोषणा का केली जात नाही? असे विचारले असता सर्व बाबी पूर्ण होण्यासाठी किंवा कायदेशीर बाबी पूर्ण होणे कोणत्याही प्रक्रियेत महत्वाचे असते असे स्पष्टीकरण दिले.
खासदारांची सुरक्षा आणि राऊतांवर टीका
खासदारांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेबाबत बोलताना सामंत यांनी, या परिस्थितीमधून ते गेल्याचा अनुभव सांगितला. “माझ्यावर तीनवेळा हल्ला झाला, पुण्यात ५०० लोकांना हल्ला केला, यवतमाळमध्ये गाडीवर दगडफेक झाली आणि अनेक जिल्ह्यात सुरक्षा असताना देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा निर्णय लोकशाही मार्गाने आणि संविधानातील असल्याने त्याचा आदर करायला हवा”, असे सामंत म्हणाले. “पक्ष बुडविण्याची सुपारी घेतलेल्यांनी तुडवाची भाषा करु नये”, अशी टीकाही सामंतांनी संजय राऊतांवर केली.
