रत्नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली नळपाणी योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा. निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मतदारसंघातील ठेकेदार उपस्थित होते.
जलजीवन मिशनच्या कामांमध्ये दिरंगाई होऊ नये, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणने परस्पर समन्वय ठेवून कामे मार्गी लावावीत. पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली वीजजोडणी आणि अन्य तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. स्थानिक नागरिक किंवा अन्य कोणाकडून कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्यास संबंधितांविरोधात पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करावी, अशा सूचनाही सामंत यांनी दिल्या.
शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचीही पालकमंत्री सामंत यांनी दखल घेतली. महाविद्यालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नसणे, प्रशिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा आणि प्रयोगशाळांमध्ये आवश्यक उपकरणांची कमतरता असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या.
विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सामंत यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव मिळावा आणि त्यांना व्यावहारिक ज्ञानाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी टेक्निकल फेस्टिव्हल आणि ऑटो एक्स्पोसारखी प्रदर्शने आयोजित करण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर अकोजवार, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते. २२ मच्छिमारांना कृषीदराने वीजपुरवठा मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्याच्या योजनांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
९ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, प्रक्रिया उद्योग वगळता मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना कृषीदराने वीजपुरवठा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने महावितरणकडे एकूण ५६ प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी २२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या सर्व २२ प्रस्तावांतील लाभार्थ्यांना कृषीदराने वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय जीवन सावंत, नगरसेवक बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, ॲड. समृद्धी मयेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
