वाई : साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्‍ट आणण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार आहे. रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शासनाची उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे, अशी माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे काम भूसंपादनात रखडले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्‍न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्‍नासंदर्भात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्याच्यासमवेत सुनील काटकर, दत्तात्रेय बनकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासन सर्व काही अटोक्‍यात आणू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा उद्रेक झाल्यास काय करणार अशी भिती व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, कोरोना रोकण्यासाठी देशातील संशोधक व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करायला हवेत. त्यासाठी मी पंतप्रधानांना ही ईमेलव्दारे कळविले आहे.

आणखी वाचा- मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच दिली जात नाही – उदयनराजे

साताऱ्यातील विविध प्रश्‍नांचे मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे ही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश प्रभु रेल्वेमंत्री असताना कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्ग आणि सातारा- पुणे डबल ट्रॅकच्या कामाची आम्ही मागणी केली होती. पण हे काम भूसंपादनात अडकल्याने रखडले आहे. यासंदर्भात येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व मार्ग निघेल, असेही त्यांनी सांगितले.