भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवत नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं होतं. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजेंनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केल्याचंही पहायला मिळालं.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार उदयनराजेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना बोटीने प्रवास केला. बोटीतील प्रवासादरम्यान उदयनराजेंनी काही काळ बोटीच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. “निसर्ग आपण सर्वांनी जपला पाहिजे, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण निर्सगासमोर फार छोटे आहोत. निर्सगामुळेच आज आपल्या सर्वांचं अस्तित्व आहे. आज आपण ग्लोबल वॉर्मिगसारख्या गोष्टींबद्दल बोलतो. वृक्षतोड झाल्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या निर्माण झाल्यात. वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे तसेच वृक्ष जपले पाहिजेत. पाणी आडवलं पाहिजे. भूजलपातळी वाढली पाहिजे,” असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.

तसेच पुढे उदयनराजेंनी आगामी लोकसभा असतील किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील स्टेअरिंग या बोटीच्या स्टेअरिंगप्रमाणे तुमच्या हातात असेल का?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उदयनराजेंनी आता ज्यांच्या हातात आहे स्टेअरिंग त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारा असं उत्तर दिलं. तसेच काय कुठं चाललं आणि स्टेअरिंग कुठं चाललं मला काही कळत नाही, अशी टीप्पणीही त्यांनी हसत हसत केली. तसेच सध्या हातात असलेलं बोटीचं स्टेअरिंगचं चांगलं असल्याचंही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे यांना गाड्यांचेही फार आवड आहे. त्यांच्याकडे गाड्यांचं खास कलेक्शन आहे. काही आठवड्यांपूर्वीच उदयनराजेंनी एका गाडीची टेस्ट ट्राइव्ह घेतल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं होतं.