सातारा:मी हतबल नाही आणि बंगड्याही भरलेल्या नाहीत ,आधी राज्यपालांवर कारवाई करा- उदयनराजे | Udayanraje bhosale expressed his displeasure over the controversial statement being made about Chhatrapati Shivaji Maharaj in Satara amy 95 | Loksatta

“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा

राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानावर कोणीही काहीही बोलत नाही.

“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा
उदयनराजे भोसले (संग्रहित छायाचित्र)

सातारा: राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानावर कोणीही काहीही बोलत नाही. त्यांच्यावर कारवाई करत नाहीत याबद्दल उदयनराजेंनी साताऱ्यात राज्यपालांचा उल्लेख करत पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. मी हतबल झालो नाही आणि बांगड्या ही भरलेल्या नाहीत मात्र यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला. त्या विचारांवर सर्व जातीधर्मातील लोकं एकत्र आल्याने स्वराज्य मिळालं. स्वराज्य स्थापन झालं म्हणजे आजची लोकशाही. प्रत्येक पक्ष वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात,आदर्श मानतात. राज्यात आजपर्यंत सुरू झालेल्या सगळ्या चळवळी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच सुरू झाल्या. आज एक जण सातत्याने महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहे. उद्या दुसरे कोणीतरी करेल नंतर हा पायंडा पडेल आणि पुढील पिढीसमोर चुकीचा इतिहास जाईल याचा विचार कोणी का करत नाही.आज सर्वधर्म समभावची व्याख्याही बदलली आहे काय की ती बदलत चालली आहे असा प्रश्न पडतो.

आज कुणी काहीही बोलतं. जे असे विधान करत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वेळप्रसंगी काय करायचं ते आम्ही करूच आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत. राज्यपालांप्रमाणे उद्या कुणीही बोलेले तर खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सर्वच जाती-धर्माची लोकं प्रत्येक पक्षात असले पाहिजे. अजेंडा काहीही असो मात्र जोपर्यंत तुमचा अजेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर जात असेल ते चांगलं आहे. मात्र तुम्ही ते आचरणात आणत नाहीत तर मग त्यांच नाव घेण्याचा तुम्हारा अधिकार नाही असेही त्यांनी सुनावले. सर्वत्र शिवरात्री गणेश जयंती ठरलेल्या दिवशी साजरी केली जाते मात्र शिवजयंती तिथी आणि तारखेप्रमाणे दोन वेळा साजरी केली जाते असे का असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवप्रताप दिन १० नोव्हेंबरला असतो, मात्र तो तिथीप्रमाणे आज का साजरा करतात.

मला शिवप्रताप दिनाचे निमंत्रण नव्हते .या कार्यक्रमासाठी यापूर्वी मला कोणी फोन केला नव्हता. मी मागील दोन-तीन दिवस बाहेर होतो. आज सकाळी साताऱ्यात आलो तेव्हा मला पत्रिका पाहायला मिळाली. तेव्हा मला समजले की आज शिवप्रताप दिन तिथीप्रमाणे साजरा केला जात आहे. या कार्यक्रमापूर्वी मला कोणाकडूनही निरोप आला नव्हता. मी नाराज नाही पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या आचार विचारांबाबत दुजा भाव करू नका असेही ते म्हणाले. मी राज्यपालांबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून भाजपा माझ्यावर कारवाई करणार असेल करू द्या ना परंतु आधी राज्यपालांवर कारवाई करा .मी उदयन भोसले या नावाला उदयनराजे लावतो आणि शिवाजी महाराजांचा वंशज समजतो, मग मला त्यांच्याबद्दल कोणीही काही बोलले तर खपवून घेण्याचा अधिकार नाही. भाजपमधील कोणीही या विषयावर काही बोलत नाही असे विचारले असता ते पत्रकारांना उदयनराजे म्हणाले तुम्ही त्यांना विचाराना. त्यांना आडवा. राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्त करत आहेत.याबद्दल सर्वच राजकीय पक्षांना विचारा असेही उदयनराजे म्हणाले त्यांच्या वर तर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल करा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 21:43 IST
Next Story
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मंगलप्रभात लोढांनी दिलं उत्तर, म्हणाले…