udayanraje bhosale slams governor bhagatsingh koshyari on shivaji maharaj statement | Loksatta

“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!

उदयनराजे भोसले म्हणतात, “मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचं आहे. राज्यपालांना…!”

“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!
उदयनराजे भोसलेंचं राज्यपालांवर टीकास्र!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यपालांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांकडून राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. भाजपामधूनही काही नेत्यांनी राज्यपालांचं हे विधान चुकीचं असल्याची भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमवीर आज भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या कार्यक्रमातर बोलताना राज्यपालांचा परखड शब्दांत समाचार घेतला. तसेच, भाजपाचं नाव न घेता पक्षाच्या काही नेतेमंडळींना लक्ष्य केलं.

काय म्हणाले होते राज्यपाल?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला होता. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. राज्यपालांनी गडकरी आणि पवारांचं कौतुक करताना शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. “छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने आदर्श झाले. नितीन गडकरी आणि शरद पवार हे आजच्या काळातले आदर्श आहेत. ते तुम्हाला इथेच भेटतील”, असं राज्यपाल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांना लक्ष्य करताना त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. “राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली, तर लोकांना भाजपानं उत्तर दिलं पाहिजे की का हकालपट्टी झाली नाही. त्यासाठीच आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत”, असं उदयनराजे भोसलेंनी यावेळी सांगितलं.

“तुम्ही ठाम भूमिका का घेत नाही?”

“शिवाजी महाराजांनी स्वत: सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला, त्याचं विकृतीकरण होतंय. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, तेव्हा तुम्ही ठामपणे भूमिका का घेत नाही की हे चुकीचं आहे. राज्यपालांना हटवलंच पाहिजे. राष्ट्रपती देशाचं सर्वोच्च पद आहे, राज्याचं सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही”, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”

“काळ्या फिती लावून काही होत नाही”

दरम्यान, राज्यपालांचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावणार का? यासंदर्भात विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं. “आम्ही जे काय करायचं ते करतो. काळी फीत लावून वगैरे काही होत नाही.त्यांची उचलबांगडी व्हायलाच हवी. ते इथे जर असते, तर त्यांचा टकमक टोकावरून कडेलोट झाला असता”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. त्यावर तुम्ही कडेलोट केला असता का? असा प्रश्न विचारताच उदयनराजे म्हणाले, “त्यांचा तोल गेला असता. मी कशाला त्यांना हात लावतोय. मी त्यांना हात लावला, तर मला कमीपणा येईल”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:11 IST
Next Story
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत