मुंबई: नीट पेपरफुटीविराेधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आता क्षुल्लक गोष्ट आहे. हे सरकार पेपरफुटी थांबवू शकत नाही, तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, जनतेला उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान नको, सरकारच बदलायचे आहे, तरुणांमध्ये पेटेलेल्या या आगीत सरकार भस्मसात झाले पाहिजे, असे आवाहन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारे यांनी हे सरकार पाकिस्तानसोबत चर्चेला तयार आहे, पण सोनम वांगचूक यांच्याशी चर्चेला तयार नाही, हे संघाच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्र आहे का, असा सवाल केला.
दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजीपार्क परिसरात शिवसेनेच्या (ठाकरे) आंदोलन करण्यात आले. शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या आंदोलनात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पेपरफुटी, बेरोजगारी, सोनम वांगचूक यांचे आंदोलन दडपण्याचा झालेला प्रयत्न यावरून धर्मेंद्र प्रधान आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच देशभक्त बांधवानो असा उल्लेख करताना ठाकरे यांनी आपण या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी नाही तर नेते होण्याचे आवाहन करण्यासाठी आलो असल्याचे तरुणांना सांगितले. तरुणांमध्ये पेटलेली ही ठिणगी सरकार बदलल्याशिवाय विझता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले. आपण जंतरमंतरवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणारच आहोत, पण राज्यातही गल्लो गल्ली, गावागावात मानवी साखळ्या, मशाल मोर्चे, मेणबत्ती मोर्चे काढून संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा हा लढा उभारण्याचे आवाहन केले.
अण्णा हजारे यांच्याशी संवाद, वांगचुक यांच्याशी का नाही
उद्धव ठाकरे यांनी मनमनोहनसिंग पंतप्रधान असण्याच्या काळात झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून दिली. त्यावेळी पंतप्रधानांनी आपला प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पाठवून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यांना कोणीही देशद्रोही, चीनचा हस्तक म्हटले नव्हते. मात्र इथे दिल्लीत आंदोलन सुरू असताना पंतप्रधान मोदी दिल्लीत असूनही उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांच्याशी बोलायला तयार नाही, याला माणुसकी म्हणायची का, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होसबाळे यांनी पाकिस्तानशी चर्चा करायला हवी, असे वक्तव्य केलेले त्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र लष्करासाठी आणि देशासाठी अहोरात्र झटणारा शास्त्रज्ञ उपोषणाला बसल्यानंतर हे सरकार चर्चेला तयार नाही, हे संघाच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्र आहे का, असा सवाल करताना सोनम वांगचूक यांच्या वडिलांनी लेह येथे तेथील आदिवासींसाठी केलेल्या आंदोलनाला स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती याची आठवण करून दिली. त्यामुळे हुकूमशहा कोणाला म्हणायचे, असा सवालही त्यांनी केला.
आता निवडणुका जाहीर करा
आंदोलन करणाऱ्या वांगचूक यांना पोलिसांच्या मदतीने चादरीने झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सत्य कधीही लपत नाही. तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार आहे. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारने हिंमत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, महाराष्ट्र तयार आहे, देश तयार आहे, आम्ही ताकदीने लढायला तयार आहोत, असे ठाकरे म्हणाले.
होय आम्ही झुरळ आहोत
देशासाठी आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांना हे सरकार झुरळ म्हणून हिणवते. या देशातला तरुण जर झुरळ असेल तर त्याचे आईबाप अगदी आपण स्वत:सुद्धा झुरळ आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या सरकारकडे स्वत:चे असे काही नाही, सर्व भाड्याने जमवलेली माणसे आहेत, त्यामुळे हे झुरळांना घाबरत असल्याची उपरोधिक टीका त्यांनी पक्षफोडीवरून भाजपवर केली. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हेही तरुणच होते. तरुणांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान असून लोकशाहीचे रक्त शोषणाऱ्या या गोचिडांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार – आदित्य ठाकरे
या देशातील जनतेने भाजपला देश बदलण्यासाठी आणि विकास करण्यासाठी बहुमत दिले होते. मात्र, हे लोक आता देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. इस्रोच्या १०० वैज्ञानिकांनी राजीनामा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जपला इस्रोसारख्या महत्त्वाच्या संस्था सांभाळता येत नाहीत, पण दुसऱ्या पक्षांचे खासदार फोडण्यात ते व्यस्त आहेत. महाराष्ट्राचा अभिजित दिपके हा तरुण मुलगा आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उपोषणाला बसला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्याची प्रमुख मागणी आहे. मात्र, भाजप सरकार तरुणांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन होत आहे, आता आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत, पुणे जाऊन थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असा आक्रमक इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
आंदोलकांचा शिवाजीपार्कवर ठिय्या
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरही आंदोलकांनी शिवाजीपार्क मैदान परिसरातच ठिय्या मांडला. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. बराच काळ आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवावी लागली.
