तुम्ही स्वतः पंतप्रधान महोदयांच्या समोर कबूल केलेलं होतं की, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जाण्याची तुमच्याकडून चूक झाली, हिंदुत्वाचा विचार सोडण्यात तुमची चूक झालेली आहे, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दीपक केसरकर यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा पुन्हा सांगितलं, आजसुद्धा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा, आम्ही सर्व जण तुमच्याबरोबर आहोत. त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला फसवलेलं नाही. उलट तुम्ही स्वतःहून सांगितलं की, तुम्ही सगळे जण निघून जा आणि आता जनतेला उलटं सांगताय हे चुकीचं आहे. जनतेला वस्तुस्थिती सांगा, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

कोकणी जनतेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अन्याय करणार असेल आणि तुम्ही त्याकडे डोळेझाक करणार असाल तर मग आम्हाला जनतेबरोबर उभं राहायला लागेल. कोणाला खोके खोके म्हणता, खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल. आम्हाला खोक्याबरोबर खेळायची सवय नाही. आम्ही जनतेबरोबर राहिलो म्हणून आमदार झालो. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्ही आमदार झालो. दिल्लीत मोदींना भेटून आल्यानंतर महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी हे दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही इथे आलात. परंतु इथे आल्यानंतर तुम्ही तो शब्द मोडलेला असेल, तर कोणी कोणाला फसवलं हे महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा समजलं पाहिजे, असं मला वाटतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना फसवलेलं आहे. तुम्हाला फसवलं मग त्याचा दोष दुसऱ्यांवर का टाकता, असा सवालही दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या खेडमध्ये होऊ घातलेल्या सभेवर ते म्हणाले, सगळ्यांच्याच सभा विराट होतात. कोकणासाठी या शासनाने जे निर्णय घेतलेत ते कधीही यापूर्वीच्या सरकारांनी घेतलेले नव्हते. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. ज्या काजू धोरणानं संपूर्ण कोकणाचा कायापालट होणार आहे, मी स्वतः त्या समितीचा अर्थ राज्यमंत्री म्हणून अध्यक्ष होतो. अडीच वर्षात केवळ त्याची हेटाळली झाली. केसरकर समिती म्हणून त्याच्याकडे हास्याने बघितलं गेलं. त्याच रिपोर्टवर साडे तेराशे कोटी कोकणाला देण्यात आले. २०० कोटी रुपये हे काजू महामंडळ स्थापन करण्यासाठी देण्यात आले. कुचेष्टा करायची, हसण्यावर विषय न्यायचे. एवढे सोपे विषय नसतात, कोकणी जनता कधीही काही मागत नसते. परंतु याच कोकणी जनतेच्या जिवावर बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. बाळासाहेबांना खूप प्रेम या जनतेनं दिलेलं आहे. अजित पवार अर्थमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साडेचारशे कोटी रुपये एका वेळेला काढून घेण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही बोलू शकले नाहीत. अडीचशे कोटींचा जिल्हा नियोजन मंडळाचा आराखडा दीडशे कोटींवर नेण्यात आला. कोकणाला उद्धव ठाकरे न्याय देऊ शकले नसल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray admitted to narendra modi the mistake of going to mahavikas aghadi secret explosion of deepak kesarkar vrd
First published on: 19-03-2023 at 13:35 IST