Uddhav and Raj Thackeray Brothers first Joint Rally: महानगरपालिका निवडणुकांसाठी अवघा एक आठवडा उरला असताना आता प्रचारात रंगत येऊ लागली आहे. आज नाशिक येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा संपन्न झाली. नाशिक महानगरपालिकेसाठी जाहीरनामा प्रकाशित करत ठाकरे बंधूंनी नाशिकच्या विकासासाठी आमच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन दोघांनीही केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंपेक्षा थोडे अधिकवेळ भाषण करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आजच्या सभेत मला खूप आनंद होत आहे. कारण माझ्याबरोबर माझा भाऊ आणि मनसेचा अध्यक्ष राज ठाकरेही आहे. राज ठाकरे यांच्या हातात नाशिक मनपाची सत्ता असतान त्यांनी काय काय कामे केली, याची माहिती दिली. आम्ही मुंबई महापालिकेत विकासकामे केली आहेत. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे नाशिकचा कायापालट होऊ शकतो.”

आम्ही जेव्हा एकत्र नव्हतो, तेव्हा एकत्र का येत नाहीत, असे विचारले जायचे. आता एकत्र आलो आहोत, तर एकत्र का आलात, असे विचारले जाते. आमच्या एकत्र येण्याची कुणी चिंता करू नका, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

भाजपाच्या हिंदुत्वावर टीका

तपोवनातील वृक्षतोडीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “भाजपाचे हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे. राम मंदिर उभारले म्हणून तुम्ही डंका पिटला, पण प्रभू रामचंद्र जिथे तपस्येला बसले होते, तेथील झाडे कापण्याचा उद्योग तुम्ही करत आहात. भविष्यात प्रभू रामचंद्र तपस्येसाठी कुठे बसले होते, असे विचारले तर काय इथले नमो भवन दाखवणार का? भाजपा धर्माची पट्टी अशी लावतो की, लोक अंधभक्त झाले पाहिजेत.”

नाशिकमधील शिवसेनेचे (ठाकरे) माजी नेते सुधाकर बडगुजर आणि मनसेच्या दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले, “भाजपा हा उपटसुभांचा पक्ष झाला आहे. गेल्यावेळी नाशिकमध्ये आमच्या व्यासपीठावर असलेली माणसे तिकडे गेल्याचे कळले. सलीम कुत्ताचा साथीदार असल्याचा आरोप एकावर केला होता. पक्ष वाढविण्यासाठी तुम्हाला कुत्ता, बिल्ली सर्व चालते. आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले, ते दुसऱ्या दिवशी तिकडे गेले.”

भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनीच यावरून भाजपावर टीका केली असल्याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.