Uddhav Thackeray : दिल्लीत जे बसलेले त्यांचे पाय चाटणाऱ्यांना मी बाडगे म्हणतो. मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. जे आज म्हणत आहेत की आम्ही मराठी नाही का? तुम्ही फक्त नावाने मराठी आहात, तुमचं रक्त तपासून बघावं लागेल की तुम्ही मराठी आहात की नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एवढंच नाही तर भाजपावाल्यांना कुठल्याही लग्नाला बोलवू नका. एकमेकांमध्ये काड्या करणं हेच त्यांचं काम असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मराठीची सक्ती रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा वरळी येथील डोममध्ये पार पडला. या वेळी भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आत्ता कुणीतरी तो भेडिया का केडिया काहीतरी बोलला. तोडा फोडा आणि राज्य करा म्हणणाऱ्यांची ही पिलावळ आहे. शिवसेनेने काय केलं? तर मराठी माणूस मुंबईबाहेर नेला. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला असं वाटत असेल तर २०१४ नंतर तुम्ही जे महाराष्ट्राचे लचके तोडले त्याचं काय? गुजरातला काय काय नेलंत? तेवढाच हिंदुस्थान आणि तेवढेच हिंदू आहेत का? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
आमचा म महापालिकेचाच नाही महाराष्ट्राचाही आहे
प्रत्येक वेळी काही झालं की भांडणं लावायची. आम्ही एकत्र येणार, निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा म महापालिकेचा आहे. नुसता महापालिकेचा नाही तर आमचा म महाराष्ट्राचा आहे. आमची सत्ताही आम्ही काबीज करुन दाखवू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बटेंगे तो कटेंगे म्हटलं होतं तेव्हा वाटलं की हिंदू आणि मुस्लिम करत आहेत. मराठा आणि मराठेतर असा वाद लावून दिला होता. आपण काय यांच्या पालख्यांचे भोई होणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
भाजपावाल्यांना लग्नाला बोलवू नका-उद्धव ठाकरे
मी नेहमी सांगतो कुणाच्याही लग्नात भाजपावाल्या बोलवू नका, येतील मस्त बासुंदी, श्रीखंड पोळ्या बिळ्या खातील. नवरा बायकोमध्ये भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. एवढं केलं तरी ठीक नाहीतर त्या पोरीलाच पळवून घेऊन जातील. यांचं स्वतःचं असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यात भाजपा कधीही नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा शेवटी आला, त्यानंतर जनसंघ लगेचच बाहेर पडला. यांच्याकडून आम्ही देशाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा का? या सगळं विकून टाका ही त्यांचं धोरण आहे. मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. आजची मुंबई कुणाच्या घशात घालत आहेत? अदाणी. आपण काय बघत बसायचं का? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.