scorecardresearch

“…अन् त्याच भुताटकीवर राहुल गांधींनी लंडनमध्ये सवाल निर्माण केले”, शिवसेनेचा भाजपावर घणाघात

“लोकशाहीत भाजपा वॉशिंग मशीनचे नक्की कर्तव्य काय यावरही…”

uddhav thackeray narendra modi rahul gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

संसदेत अदानीवर प्रश्न विचारणाऱ्यांचे माईक आपोआप बंद होतात. लोकशाहीतली ही भुताटकी आहे. त्याच भुताटकीवर राहुल गांधी यांनी लंडन येथे सवाल निर्माण केले. लंडन ही लोकशाहीची जननी आहे असे मानले जाते. आपण दीडशे वर्षे इंग्रजांचे गुलाम होतो. त्या गुलामीच्या बेड्या तोडताना मोदी व भाजपा कोठेच नव्हता, असा घणाघात शिवसेनेने ( ठाकरे गट ) केला आहे.

“इंग्रज शेवटी आपण घालवलेच, पण जाता जाता ते ‘लोकशाही’ची भेट देऊन गेले हे विसरता येणार नाही. राहुल गांधी यांनी लोकशाहीवरील खदखद व्यक्त करण्यासाठी लंडनचे व्यासपीठ निवडले ते त्यासाठीच,” असेही शिवसेनेनं ‘सामना’ अग्रलेखातून म्हटलं आहे.

हेही वाचा : आमदार-खासदारांनाच पेन्शन का? कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बच्च कडूंचं सडेतोड उत्तर; म्हणाले…

“हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का, हाच प्रश्न निर्माण झाला असताना लोकशाहीचा अपमान वगैरे झाला असा कंठशोष करणे हा निव्वळ फार्स आहे. ‘हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना संसदेतील माईक बंद केले जातात,’ अशी टीका गांधी यांनी केली. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकशाहीवरील पुतनामावशीचे प्रेम उतूमातू जाताना दिसत आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी गदारोळ केला व कामकाज बंद पाडले. पंतप्रधान मोदींना तर लोकशाहीच्या नावाने जणू हुंदकेच फुटत आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

“जगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानच्या लोकशाही परंपरेचे नुकसान करू शकत नाही हे मोदी यांचे म्हणणे खरे आहे, पण हिंदुस्थानातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम प्रत्यक्ष सत्ताधारी भाजपा करीत आहे व त्याच भाजपाचे नेतृत्व मोदी करीत आहेत. मुळात राहुल गांधी यांनी लोकशाहीबाबत लंडन येथे केलेली विधाने चूक आहेत काय याचे आत्मचिंतन मोदी पक्षाने करायला हवे,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

“विरोधी पक्षाचे अस्तित्व मान्य करायचे नाही. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या राजकीय विरोधकांना खतम करायचे, तुरुंगात डांबायचे हे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? लोकशाहीत भाजपा वॉशिंग मशीनचे नक्की कर्तव्य काय यावरही चिंतन होणे गरजेचे आहे. मुळात निष्पक्ष निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. आज निवडणूक आयोग व निवडणूक प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही. ‘ईव्हीएम’ पद्धतीत भाजप घोटाळा करत असल्याची शंका लोकांच्या मनात आहे. ईव्हीएममध्ये अदानी व्हायरस घुसवून लोकांची मते फिरवली जातात. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या ही लोकभावना आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांची निधीवरून अजित पवारांसमोर जोरदार टोलेबाजी; आठवलेंच्या कवितेचा आधार घेत म्हणाले…

“हिंदुस्थानात जन्म घेणे हे दुर्भाग्य असल्याचे लोक मानत होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी परदेशात जाऊन केले. तेव्हा देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या आत्म्यास किती वेदना झाल्या असतील? पण मोदी यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना देश मालकी तत्त्वाने चालवायचा आहे. त्यासाठी मर्जीतल्या एकाच उद्योगपतीला एअर इंडियापासून एलआयसी, बँका, सर्वच सार्वजनिक उपक्रम विकून लोकशाहीच्या पाठीवर शेवटची काडी ठेवण्यात आली आहे,” असं टीकास्र शिवसेनेनं भाजपावर केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 08:02 IST
ताज्या बातम्या