विधानसभेसाठी युतीवर शिक्कामोर्तब?

जागा वाटपाच्या मुद्दय़ावर ‘आमचं ठरलंय’, त्यामुळे नाराजीचा, वादाचा कुठलाच मुद्दा नाही. दोन चार जागा वाढवून मिळण्यासाठी नाही, तर हिंदुत्वासाठी आम्ही युती केली आहे, असे सांगत  विधानसभा निवडणुकीसाठी निश्चितपणे युती होणार, असा स्पष्ट निर्वाळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे सहकुटुंब आणि नवनिर्वाचित खासदारांसोबत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला आले आहेत. या वेळी त्यांच्या सोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नूतन खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रिमंडळात एकच अवजड उद्योग खाते दिल्याने आणि नुकतेच चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी मित्रपक्षांना १८ जागा सोडत उर्वरित जागांवर ५०-५० टक्के जागांचा युतीचा प्रस्ताव जाहीर केल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले.

शिवसेना नाराज आहे का, असे विचारताच ‘तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का?’ असा प्रतिप्रश्न करतच ठाकरे यांनी या विषयाला हात घातला. ठाकरे म्हणाले, की जागावाटप असेल किंवा केंद्रातील खातेवाटप याबाबत आमचा भाजपशी संवाद आहे. या दोन्हीही मुद्दय़ांवर काय करायचे हे ठरलेले आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही. मुळात शिवसेना कोणत्याही गोष्टी चोरून करीत नाही. ही युती हिंदुत्वासाठी आहे.

ठाकरे-पाटील सूर जुळलेले

विधानसभेसाठी महायुती होणार असे स्पष्ट करतानाच ठाकरे यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती. ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात सुरुवातीपासूनच पाटील सहभागी झाले आहेत. पत्रकार परिषदेवेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी खास आसनाची व्यवस्था केली होती. मात्र ठाकरे यांनी तेथे पाटील यांना बसण्यास  भाग पाडले. या वेळी ठाकरे यांना पत्रकारांनी वारंवार जागावाटपाच्या प्रस्तावावरून विचारणा केली, पण अविचल ठाकरे यांनी आकडेमोडीच्या खोलात (आणि त्यावरून उठणाऱ्या वादात) न जाता विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार हे स्पष्ट केले. ठाकरे यांचा हा निर्धार चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हसू वाढवणारा होता.

ठाकरे पुन्हा अयोध्येला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना घेऊ न अयोध्येत जाऊ न राम मंदिराच्या निर्मिताचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.