शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डिंपल प्रकाशनच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती होती. यावेळी त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात तरुणांचं कौतुक केलं. तर भाजपाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करुन येणाऱ्या अफझल खानाशी केली. एवढंच नाही तर आपण प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हटलंय उद्धव ठाकरेंनी?

अनेकांना वाटतं की उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचे विचार मांडतात. तर ते तसं नाही. विचार एकच आहे. तो आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आजच्या काळात जर का बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे असते तर त्यांच्या मदतीने सत्तेत बसलेल्या लोकांनीच त्यांना देशद्रोही, हिंदुत्व विरोधी वगैरे ठरवलं असतं. काळानुरुप विचारांमध्ये काही प्रमाणात बदल करावा लागतो आणि शब्दांमध्येही बदल करावा लागतो. मी जेव्हा प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली तेव्हा माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यावेळी मला भाषेबाबत प्रश्न विचारला, बाळासाहेबांची भाषा आणि तुमची भाषा वेगळी आहे. मी म्हटलं मला बोलताच येत नाही. आता मी पंतप्रधान नाही हा भाग आहे, पण मला खरंच तसं बोलता येत नाही. बाळासाहेबांची भाषा किंवा प्रबोधनकारांची भाषा ही त्या काळाची गरज होती. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी मूर्ती घडवली आहे, तिच्यावर आता मी कशाला काही घडवत बसू? त्या मूर्तीची पूजा करणं हे माझं काम आहे. माणसाने धर्माला जन्म दिला आहे, धर्माने माणसाला जन्म दिलेला नाही हे माझ्या आजोबांनी १०० वर्षांपूर्वी म्हटलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माणुसकी हा खरा धर्म हे बाळासाहेबांनी अनेकदा म्हटलंय-उद्धव ठाकरे

माणुसकी हा खरा धर्म आहे हे बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा म्हटलं आहे. मी वाक्य काय म्हटलं होतं की युवाशक्ती महत्त्वाची आहे पण बुवाशक्ती जास्त माजली आहे. मला सगळ्या युवकांचा अभिमान आहे. लोकशाहीने मान टाकली असं वाटत असताना युवकांनी दाखवून दिलं की लोकशाहीने मान टाकली नाही तर लोकशाहीने कात टाकली आहे. आज राजकीय पक्षांवरचा युवकांचा विश्वास उडाला ही वस्तुस्थिती आहे. न्याय मागणार कुणाकडे? आम्ही चार वर्षांपासून न्यायाची वाट पाहतो आहोत. लोकशाहीचा मुडदा पडला आहे, संविधान पायदळी तुडवलं जातं आहे अशात विश्वास ठेवायचा कुणावर? ज्या युवकांनी आंदोलन केलं त्यांना झुरळ म्हटलं गेलं. त्यांनी का विश्वास ठेवायचा? त्यानंतर कुणी रस्त्यावर आलं आणि दगड हातात घेतलं तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणणार? आपल्या देशात रितसर मार्गाने न्याय मिळत नसेल तर काय होणार? बाळासाहेबांचं वाक्य आहे न्याय मागून मिळत नसेल तर कानाखाली वाजवून न्याय मिळवा तेच या सगळ्यांनी केलं.

भाजपामध्ये आणि अफझल खानात फरक तो काय?

युवकांची झुरळ म्हणून संभावना होत असेल तर ते पेटून उठणार नाही? मला पु.ल. देशपांडे यांचं वाक्य आठवतं आहे. कुणीतरी म्हणालं होतं की तुमच्या देशातल्या युवकांच्या तोंडी गाणी कुठली आहेत सांगा मी भवितव्य सांगतो. आज जर आपण देशाच्या युवकांच्या तोंडी आझादी गाणं गात आहेत. आझादी कसली? भूक, बेकारी यापासून स्वातंत्र्य हवंय. आमच्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही हे युवक म्हणत आहेत. ज्यांना झुरळ म्हटलं गेलं त्यांना जेन झी म्हणत आहेत. मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय होतं जेव्हा त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली? ज्ञानेश्वरांचं वय काय होतं? आजच्या युवकांना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पहाड का चुहाँ म्हणणारा अफजल खान यांच्यात फरक काय? पहाड का चुहाँ म्हटल्यावर महाराजांनी खानाचा कोथळा काढला. उद्या या युवकांनी असं केलं तर तुम्ही जाब कुणाला विचारणार? कारण आता त्यांची मनं पेटली आहेत. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.