scorecardresearch

“बाबरी पडल्यानंतर बाळासाहेबांना एक फोन आला, त्यावर ते म्हणाले…”. उद्धव ठाकरेंनी संगितली सहा डिसेंबरची आठवण!

उद्धव ठाकरे म्हणतात, “तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती!”

uddhav thackeray on balasaheb thackeray babari masjid
बाबरी पडली, तेव्हा मातोश्रीवर नेमकं काय घडलं होतं?

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत जाहीर सभेत बोलताना राज्यातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. गेल्या अडीच वर्षांपासून अर्थात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून ही त्यांची पहिलीच जाहीर राजकीय सभा ठरली होती. त्यामुळे या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. सभेतील भाषणात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच, काही ठिकाणी त्यांनी टोलेबाजी देखील केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मातोश्रीवर काय घडलं, याविषयीची आठवण सांगितली.

बाबरी मशिद प्रकरणावरून फडणवीसांवर निशाणा

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी बाबरी मशीद प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. बाबरी पडली, तेव्हा मी तिथे होतो, असं विधान काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केलं होतं. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली. “ते म्हणतात बाबरीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते नव्हतेच, मी गेलो होतो. तुमचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा शाळेची सहल गेली होती का तिथे? तुमचं वय काय? बोलता किती? तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला देखील लगावला. “तुम्ही नुसतं बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता, तरी बाबरी खाली आली असती. लोकांना श्रमच करायला लागले नसते. तुम्ही एक पाय टाकला असता तरी बाबरी खाली आली असती. आता हे म्हणतायत ती मशीद नव्हती. तो ढांचा होता. मग तेव्हा एवढं टिपेला का सांगितलं मंदीर पाडून मशीद बांधली?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता.

Uddhav Thackeray BKC Rally : “…तर महाराष्ट्र असा पेटेल, की तुम्हाला पळता भुई थोडी होईल”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं आव्हान!

‘त्या’ दिवशी मातोश्रीवर काय घडलं?

६ डिसेंबर रोजी मातोश्रीवर काय घडलं, याची आठवण यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितली. “बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांना सांगितलं की साहेब बाबरी पाडली. ते म्हणाले काय सांगतो? बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला. त्यांनी उचलला. समोरच्या माहितीवर ते म्हणाले, मग? जर शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. फोन ठेवल्यावर बाळासाहेब मला म्हणाले ही कसली यांची औलाद. जे लोकांना कारसेवा करायला बोलवत आहे. हे असलं पुचाट नेतृत्व आहे. नेतृत्वाचं लक्षण हेच असतं. जो नेता लोकांना भडकवून त्याने सांगितलेलं काम केल्यावर जबाबदारी झटकतो, तो नेता असूच शकत नाही. हेच काम भाजपानं केलंय. सुंदरसिंग भंडारी तेव्हा हेच म्हणाले होते की हे आम्ही केलेलं नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray bkc rally speech reminds babri demolish day balasaheb thackeray pmw

ताज्या बातम्या