scorecardresearch

“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा, पण…”, २०२४ च्या निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.

sanjay raut and uddhav thackeray
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होती. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीविरोधात निवडणूक लढवावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- VIDEO: कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या अन् धुराळा; लँडिंग न करताच बीएस येदियुरप्पांचं हेलिकॉप्टर माघारी फिरलं

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “हे पाहा, याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात.”

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास आम्ही सांगितलं होतं, पण…”, दीपक केसरकरांचं विधान

“पण शेवटी या देशातला मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येतं. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे,” असंही राऊत म्हणाले. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 18:21 IST
ताज्या बातम्या