मुंबई: माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांची समजूत काढण्यात अखेर शिवसेना ठाकरे गटाला यश आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींपासून ते मुंबईत प्रदेशाध्यक्षांपर्यंत केलेल्या मनधरणीनंतर काँग्रेसने विनंती मान्य केली. गांधीभवन येथे झालेल्या बैठकीनंतर थेट विधानभवनात पोहोचत दोन्ही पक्षांतील नेत्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांचा अर्ज दाखल केला.

उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या काँग्रेस नेत्यांना न सांगताच शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आले. यामुळे संतप्त झालेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस विधान परिषदेला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची मिळून ३० मते असली तरी ऐनवेळी फोडाफोडी झाल्यास महाविकास आघाडीतील फूट महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती. दुसरीकडे काँग्रेसकडेही अवघी १६ मते असल्याने त्यांचाही उमेदवार निवडून येणे शक्य नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधला. मात्र तिथूनही स्थानिक पातळीवर चर्चा करण्याचा संदेश मिळाल्यानंतर गांधी भवन येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीत अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर दाखल झाले. तिथे काँग्रेसचा उमेदवार देण्याबाबत चर्चा करीत असलेल्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मनवण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला. एक ते दीड तास चाललेल्या चर्चेनंतरही काही मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे यांनीच हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. यावेळी त्यांच्यात झालेल्या संवादानंतर सपकाळ यांनी विधान परिषदेला उमेदवार न देण्याची तयारी दर्शवली. चर्चेनंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटला आणि काँग्रेसने अंबादास दानवे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, भाई जगताप हे विधान परिषदेत अंबादास दानवे यांचा भरण्यास दाखल झाले.

राज्यसभा, विधान परिषदेच्या जागेवर तडजोड

दरम्यान या चर्चेवेळी काँग्रेसकडून आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या एका जागेची मागणी करण्यात आल्याचे समजते. मात्र २०२८ ला राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळाल्यास संजय राऊत यांच्या फेरनिवडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावेळी निर्माण होणाऱ्या पेचातून ठाकरे गट काय मार्ग काढणार हे त्यावेळीच स्पष्ट होईल.