शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी मातीतील गद्दारी असा उल्लेख करत बंडखोर शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचं मत व्यक्त केलं. ते शनिवारी (२६ नोव्हेंबर) बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “दसऱ्याचा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर झाला. तो प्रचंड मोठा झाला. तेव्हाच मी ठरवलं होतं की शिवतीर्थापासून सुरुवात केल्यावर मुंबईच्या बाहेर माझी जी पहिली सभा होईल ती जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या माझ्या बुलढाण्यात घेईल. कारण ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघालं पाहिजे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे.”

“आज संविधान सुरक्षित आहे का?”

“आज संविधान दिन आहे. या दिवशी हे संविधान सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. चार-पाच दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आलो होतो. तेव्हा त्यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता. संविधान सुरक्षित आहे का हाच प्रश्न माझ्याही मनात आहे आणि तुमच्याही मनात असायला हवा. कारण पुढील वाटचाल आपल्याला त्याच दिशेने करावी लागणार आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. हे रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यावर शिवतीर्थावरच शपथ घेतली आणि पहिल्यांदा आमची कुलस्वामिनी एकविरा आईच्या दर्शनला गेलो. त्यानंतर मी अयोध्येला गेलो होतो.”

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, नवनीत राणा म्हणाल्या, “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”

“त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही, कारण…”

“हे आज तिकडे गुवाहटीला नवस फेडायला गेले आहेत. गेल्या आठवड्यात स्वतःचा हात दाखवायला गेले होते. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार आहे. त्यांची हातसफाई आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत. तेच तुमचे मायबाप आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोले लगावले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticize shivsena rebel shinde faction in buldhana public rally pbs
First published on: 26-11-2022 at 17:34 IST