Uddhav Thackeray on BJP: महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना पक्षप्रवेश देऊन निवडणुकीचे तिकीट दिले. भाजपाच्या या धोरणावर खुद्द भाजपाच्या निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत भाजपावर जोरदार टीका केली.
नाशिक येथे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा पार पडली. या सभेत दोघाही भावांनी भाजपावर टीकास्र सोडले. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपा हा उपटसुभांचा पक्ष झाला आहे. गेल्यावेळी नाशिकमध्ये आमच्या व्यासपीठावर असलेली माणसे तिकडे गेल्याचे कळले. पण आज आल्यानंतर पाहतो, तर व्यासपीठ तितकेच भरलेले आहे. आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. अस्सल निष्ठावंत आजही आमच्याकडे आहेत. आम्ही मोठी केलेली माणसे गेली असतील पण ज्यांनी त्यांना मोठे केले, ती सामान्य माणसे आमच्याबरोबर आहेत.”
“टीव्हीवर आज भाजपावाले माझे भाषण चोरून बघत असतील. त्यांना मला विचारायचे आहे की, तुमच्या नशीबी काय जगणे आले. उपटसुभांच्या सतरंज्या तुम्हाला उचलाव्या लागत आहेत. आमच्यात होते, तेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत होतात. सलीम कुत्ताचा साथीदार असल्याचा आरोप एकावर केला होता. पक्ष वाढविण्यासाठी तुम्हाला कुत्ता, बिल्ली सर्व चालते. बरबटलेली माणसे पक्षात घेऊन त्यांचे लंगोट वगैरे धुवून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे, हे भाजपाच्या निष्ठावंतांच्या नशीबी आले आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
रावणालाही पक्षात घेतील
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले, ते दुसऱ्या दिवशी तिकडे गेले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनीच यावरून भाजपावर टीका केली. भाजपा उपऱ्यांचा पक्ष असल्याचे त्या म्हणाल्या. तिकडे सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शनी सिंगणापूर आणि भाजपाला दरवाजेच नाहीत. पण शनी सिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त असतात आणि भाजपात येणारे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत. चोर, दरोडेखोर येत आहेत. ज्या रामाने रावणाचा वध केला, तो रावण जरी आला तरी त्यालाही पक्षप्रवेश देतील. इतके हे निर्लज्ज झाले आहेत.”
मोहन भागवतांचे तरी ऐका…
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. पण राज ठाकरे बोलले तसे, ज्यांना राजकारणात मुले होत नाहीत, ते आमची मुले दत्तक घेतात. ते काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना ‘अपत्य वाढवा, अपत्य वाढवा’, असा टाहो फोडावा लागतो. अपत्य वाढवा म्हणजे तुमची राजकारणातील अपत्य वाढवा. मोहन भागवतांचे इतके तरी ऐकायला हवे.”
