Uddhav Thackeray on Maharashtra Corporation Election 2026 : राज्यात महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. मात्र, मतदानादरम्यान विविध मतदान केंद्रांवर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्र्‍यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांचीच दमछाक झाली आहे. तर, काही ठिकाणी बोटावर लावण्यात आलेल्या शाईवरूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरूनच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचाही दाखला दिला.

“मतदान आणि मतमोजणी वेगवेगळ्या दिवशी केली जाते. फार पूर्वी एकाच दिवशी मतमोजणीही होत असत. परंतु, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मतमोजणी होई. परंतु, आता टपाली मतदानासाठी आज तीन वाजता पेट्या खोलण्यात येणार असल्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हा कोणता प्रकार, ही कोणती लोकशाही आहे? संविधान म्हणतं मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणतं करूनच दाखवा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीय. यंदा पैसे वाटपाचं काम, सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात. राजबरोबर ठाण्याला गेलो होतो, तिथेही आमच्या उमेदवारांनाही कोट्यवधि ऑफर करून उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं गेलं होतं. महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका जिंकण्याकरताही महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीय. गणेश नाईकांचं मतदान केंद्रच फरार होतं. त्यांना मतदान केंद्र शोधण्याकरता चार तास लागले. ही मंत्र्‍यांची हालत आहेत. टांगा दुखल्या, केंद्र फरार. खेटे घालून टांगा दुखले आहेत. डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे हा प्रश्न गणेश नाईकांसमोर आहे. यावर इलाज म्हणून निवडणूक आयुक्तांना निलंबित करावं. कारण ते फुकटचे पैसे खात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसत्ताच्या बातमीची दखल

उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ता ऑनलाईनवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचीही दखल घेतली. पुण्यातील रवींद्र गावकर या मतदाराच्या नावापुढे महिलेचा फोटो होता, यासंदर्भात आज सकाळीच बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली.