scorecardresearch

कर्जमुक्ती करून शेतक ऱ्यांना संकटातून सोडवा- उद्धव ठाकरे

दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाडय़ातील मंडळींना भेटायला मी आलो आहे. लांबलचक भाषण करणार नाही.

Shiv sena, उद्धव ठाकरे,Uddhav Thackeray,शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
राज्य सरकारने पीककर्जावर व्याजमाफीचा योग्य निर्णय घेतला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकताना कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथील सभेत बोलताना दिला.
ठाकरे यांच्या मराठवाडा दुष्काळ दौऱ्याचा प्रारंभ बुधवारी लातुरातून झाला. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यास ५० टँकरचा प्रारंभ ठाकरे यांच्या हस्ते टाऊन हॉलच्या मदानावर करण्यात आला. जिल्हय़ात १०० ग्रामपंचायतींना ३ हजार लिटर क्षमतेच्या टाक्यांचे वाटपही या प्रसंगी करण्यात आले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे व रवींद्र गायकवाड, शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोरे, संजय सावंत, बळवंत जाधव, संतोष सोमवंशी, नागेश माने आदी उपस्थित होते.
‘‘दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाडय़ातील मंडळींना भेटायला मी आलो आहे. लांबलचक भाषण करणार नाही. नुसते भाषण ऐकून तुमचे ना पोट भरणार ना तहान जाणार. शिरा ताणून नुसतेच बडबडायचे ही शिवसेनेची परंपरा नाही. आमच्या परीने दुष्काळग्रस्तांसाठी करता येईल ते आम्ही करीत आहोत. १३७ वर्षांतील या वर्षीचा दुष्काळ सर्वात मोठा आहे. पेरणीच न झालेले इतिहासातील हे पहिले वर्ष आहे. राज्य सरकारने कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चांगला असला, तरी कर्ज अद्यापि जिवंतच आहे! राज्य व केंद्र सरकारांनी शेतकऱ्याला कर्जातून एकदाचे बाहेर काढले पाहिजे. एक पाऊल पुढे टाकून कर्जमाफी दिली पाहिजे. नाही तर कर्जदार शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘‘मी अकारण सरकारवर टीका करणार नाही. मात्र, सरकारचे जे पटत नाही त्याबाबत निश्चित बोलेन. शिवसेनेतर्फे कन्यादान योजनेंतर्गत ८००पेक्षा अधिक सर्वधर्मीय विवाह लावले. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही तर मदतीस धावून जाणारे हिंदुत्व आहे. सरकारच्या योजनेत लोकवाटा भरण्याची रक्कम नाही म्हणून अनेकांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. शिवसेनेने अनेक ठिकाणी लोकवाटपाची रक्कम भरुन लोकांना लाभ मिळवून दिला. लातुरात आमच्यासाठी वर्षांनुवष्रे राजकीय दुष्काळ आहे. मात्र, आम्ही माणुसकी जपणारी माणसे आहोत. निवडणुकीत अपशय आले म्हणून मदतीसाठी हात आखडता घेत नाही. शेतकऱ्यांनी या दुष्काळावर मात करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. हेही दिवस जातील,’’ या अवघड परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिवसेना आपल्यासोबत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही’ ; उद्धव ठाकरेंच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना मदत
उस्मानाबाद ; राज्यातील सत्तेत भाजपसोबत शिवसेनाही आहे. सरकारने दुष्काळी स्थितीत केलेल्या कामाचे उणेदुणे काढण्यापेक्षा कामे कशी करावी, हे दाखवून देण्याचे काम शिवसेना करीत आहे. यातून गोरगरिबांचा विकास होईल. सत्ता आली आणि दुष्काळ पडला, अशा स्थितीत सरकारचे उणेदुणे काढण्याची ही वेळ नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या वतीने शहरातील हातलाई मंगल कार्यालयात बुधवारी गोरगरिबांना पाण्याच्या टाक्या, जनावरांसाठी सिमेंटचे हौद ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ४७ मुला-मुलींच्या शिक्षणासाठी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी पालकत्व स्वीकारले. या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांसाठी शालोपयोगी साहित्य, ५ गरीब महिलांना शिवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले.
ठाकरे म्हणाले की, सध्या दुष्काळी स्थितीत सरकारला ठोस उपाययोजना राबविण्यास सर्वानी सहकार्य करण्याची गरज आहे. सरकार उपाययोजनांमध्ये कमी पडू नये, या साठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेनेने आपापल्या परीने शिवजलक्रांती, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अशा प्रभावी योजनांच्या अंमलबजावणीकडे अधिक लक्ष दिले आहे. पाऊस पडल्यास एकमेकांची उणीदुणी काढत बसू. मात्र, सध्या दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे काम करावे लागणार आहे. परंडय़ात सावंत बंधूंनी स्वखर्चातून ८५ किलोमीटर शिवजलक्रांतीचे काम केले. पाऊस झाल्यास दोन टीएमसी पाणीसाठा होईल. त्यामुळे जवळपास ५०-५५ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशा पद्धतीने गोरगरिबांसाठी काम करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी परंडा व उस्मानाबाद दौऱ्यावर आलो असल्याचे ठाकरे यांनी आवर्जून नमूद केले. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार नीलम गोऱ्हे यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे व रवींद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, ओमप्रकाश राजेिनबाळकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हा संपर्कप्रमुख गौरीश शानभाग, नगरसेविका प्रेमाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई देशमुख, प्रा. शिवाजी सावंत यांची उपस्थिती होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray demands loan waiver for maharashtra farmers

ताज्या बातम्या