मुंबई: विद्यार्थ्यांची माफी काय मागता, उलट आधी विद्यार्थ्या्ंची आणि त्यांच्या कुटुंबाची पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी केली.
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठकीनंतर ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान आधी या आंदोलक विद्यार्थ्यांना झुरळ आणि भरकटलेले म्हणतात. आणि आता आम्ही त्यांना माफ केले असे सांगतात. मुळात पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांवर ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदींनी आणि अमित शहांनी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने काठीला खिळे लावून विद्यार्थ्यांना मारण्यात आले, त्यांच्यावर छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला.
एवढेच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडून त्यांचे कपडे फाडले गेले. म्हणजे ऐकल्यावर सुद्धा अंगावरती शहारे येत होते. पण त्या मुलांनी ते भोगले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी ठाकरे यांनी केली. शिक्षण पद्धतीत सुधारा ही विद्यार्त्यांची साधी मागणी होती. जे तुम्ही आता करताय ते तुम्ही पहिल्या दिवशी त्यांच्याशी बोलून करू शकत होतात. तुम्हाला अतिरेक्यांशी आणि पाकिस्तानशी बोलायला काही वाटत नाही. पण आपल्याच देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्यांना तुम्ही झुरळ म्हणताहेत, त्यांना तुम्ही भरकटलेले म्हणताहेत. काय पुढे देश चालणार कसा? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार सडकून टीका केली.
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दिल्लीत विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. त्यांना सरकार विरोधात रस्त्यावर उतरावे लागले. सरकार जे आता करत आहे. ते विद्यार्थांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी केले असते तर आजची वेळ आली नसती, अशी टीका ठाकरे यांनी केली. विद्यार्थ्यांवर अत्यंत कठोर पद्धतीने लाठीमार करण्यात आला. मोदी शहा यांना पाकिस्तानशी संवाद साधता येतो. सरकार अतिरेक्यांशी चर्चा करते पण स्वतःच्या देशातील विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ज्यांनी आंदोलन केले. त्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशाचे भाग्य विधाते असलेल्या विद्यार्थांशी सरकार असे वागत असेल तर ते दुर्देवी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
