महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट आलं आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले आणि सरकारला सूचनाही केल्या. उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीकाही केली. येत्या ४५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता ही मदत केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना काय मदत केली जाते याची माहिती देण्यासाठी मंत्रालयात डॅशबोर्डची स्थापना केली पाहिजे. त्यावर रोजची माहिती दिली पाहिजे. तसेच अधिवेशनात पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं करणार याची माहितीही दिली पाहिजे. अधिवेशनासाठी कशाचीही वाट पाहू नये. येत्या दोन ते तीन दिवसात अधिवेशन घ्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत काय मागण्या केल्या?

१) गेल्या वर्षी शेतकऱ्यांना किती पॅकेज जाहीर केलं, ते किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं याची माहिती द्या.

२) आता जी कर्जमाफी करण्यात आली. त्याचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला याची यादी द्या

३) सरकारने पीक विमा योजना गुंडाळली आहे. दरवर्षी शेतकरी पिक विम्यासाठी नोंद केली जाते. त्यात अर्ध्याहून अधिक जास्त शेतकऱ्यांनी नोंद केलीच नाही. पावणे दोन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ही योजना बंद केल्यावर ती संख्या ७० हजारावर आली, त्याबाबत माहिती द्या.

४) सोलापूर, संभाजीनगर विदर्भातल्या परिस्थितीबाबत तातडीने कॅबिनेट मिटिंग घेऊन निर्णय घ्यायला हवा.

५) दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा.

या प्रमुख मागण्या उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत. तसंच लाडकी बहीण योजना, बुलेट ट्रेनची आपली गरज नाहीये, मुंबईतल्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार आहे. इतर कामांमध्ये कारण नसताना वळवलेला पैसा जर शेतकऱ्यांसाठी वळवला तर यातून मार्ग निघेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतिहासातलं मोठं पॅकेज म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली होती. आता सरकार वेळकाढूपणा करतं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

गेले काही वर्ष अतिवृष्टी, पूर नैसर्गिक संकटाला महाराष्ट्र तोंड देत आला आहे. गेल्यावर्षी मी मराठवाड्यात गेलो होतो. त्यावेळी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला होता. पिकं वाया गेली होती. घरदारांचं नुकसान झालं होतं, वह्या पुस्तक वाहून गेले होते. विचित्र संकट होतं. त्यावेळी मी दौरा केला होता. कर्जमुक्तीची मागणी केली होती. तेव्हा वातावरण गरम होत होतं. आताही तीच परिस्थिती आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.