मुंबई : पु.ल. देशपांडे यांची ओळख ‘कोट्या’धीश अशी होती. पुलंनंतर मी उद्धव ठाकरे यांना ‘कोट्या’धीश म्हणेन, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे या सभागृहात पुन्हा निवडून आले तर अधिक कोट्या ऐकायला मिळाव्यात अशी मार्मिक टिपणी केली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी (अजित पवार) अमोल मिटकरी, राष्ट्रवादी (शरद पवार) शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केजे, रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केणेकर यांना निवृत्त होणाऱ्या नऊ आमदारांना विधान परिषदेत निरोप देण्यात आला.

उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सहप्रवासी असा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१० सालानंतर सहवास अधिक दृढ झाल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राजकारणी नाही, असे अधोरेखित करताना बाळासाहेबांप्रमाणेच ते परिणामांची चिंता करीत नाहीत. ते उत्तम छायाचित्रकार असल्याचे सांगताना त्यांच्या छायाचित्रांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडत असल्याचे ते म्हणाले. २०१४ पासून त्यांच्यासोबतची मैत्रीची भावना अधिक तयार झाली मात्र आता आपल्या राजकीय भूमिका वेगळा असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांप्रमाणेच सर्वसामान्यांना राजकारणात मोठे केले. ठाकरे यांचा स्वभाव शांत आणि संयमी असला तरी राजकारणात त्यांना वेगवेगळा आवेश ते आणत असल्याचे सांगताना भाषणाच्या शेवटी त्यांनी ‘साजिश की सौगात पकडकर बैठ गये, अनचाहे हालात पकडकर बैठ गये, जिनको मेरा हाथ पकडकर बैठना था, वो बात पकडकर बैठ गये.. अशा आशयाचा शेर ऐकवत फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंनी साथ सोडल्याची बाब फडणवीसांनी अधोरेखित केली.

नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी आपला स्वभाव हा मूळ कलाकाराचा असल्याचे अधोरखित करताना अनपेक्षितरीत्या आपण मुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेचे सदस्य झाल्याचे सांगितले. निरोपाच्या दिवशी उपस्थित राहिल्यावर आपल्याविषयी नेमके इतरांच्या मनात काय आहे हे कळते असा टोला लगावतानाच ‘ऐसी कोन सी बात थी, और किसीका हात पकडना पडा, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

यावेळी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात खंबीरपणे साथ देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच अन्य सहकारी मंत्री, प्रशासन, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री असताना कोरोनाकाळात केलेले काम तसेच अटलसेतू, सागरी मार्ग यासारखे विकासप्रकल्प अर्थचक्र थांबले असतानाही सुरू ठेवल्याची आठवण करून दिली.

यावेळी ज्ञानेश्वरांच्या भारुडातील ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड, एक वसेचिना’ या पंक्तीप्रमाणे सरकार असल्याचा उल्लेख करताना या गावांची पाटीलकी फडणवीसांकडे असल्याचे ते म्हणाले. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलून घेतले, मात्र आता स्वार्थापोटी रेडे कापले जात आहेत, असा टोला त्यांनी शिवसेना फुटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

यावेळी विंदा करंदीकर, सुरेश भट यांच्या काव्यपंक्तींच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विंदांच्या ‘केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयार पाहिजे’ यातील काव्याप्रमाणे अनुभव घेत असल्याचे सांगितले. जे डोक्यावर घेऊन नाचतात, तेच स्वार्थापोटी पायदळी तुडावयला बघत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्याचवेळी सुरेश भटांच्या ‘मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळत नाही. नाही भेटला असा कोणी ज्याला छळले नाही. रुसून राहिले अगदी माझ्या जवळचे पण मी कुणालाच कळलो नाही,’ अशी खंत व्यक्त करताना त्यांनी मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय, असे ते म्हणाले.

ठाकरेंनी शिंदेंचा उल्लेख टाळला

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख टाळला. मुख्यमंत्री महाेदय सभागृहात आलो तेव्हा आपल्याआधी जे बोलत होते… भेटू वगैरे असा उल्लेख करत मुख्यमंत्री महोदय आपल्याला मी थोड्या वेळाने भेटणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे तर काही जणांसाठी इेथे भेटलात… असे म्हणत त्यांनी उल्लेख न करता शिंदे यांना टोला लगावला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मांडताना उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘साहेब’ असा करतानाच त्यांना निरोगी दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.