पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. देशभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मध्य प्रदेशसाठी भाजपानं उमेदवारांची यादीही जाहीर केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या अनुषंगाने वातवरण तापू लागलं आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आहे. भाजपाला लक्ष्य करताना संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे.
“सनातन धर्मासाठी मोदींची गरज नाही”
एनडीए सनातन धर्मविरोधी असल्याची टीका मोदींनी केल्यानंतर त्यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. “सनातन धर्माचं कुणीही समूळ उच्चाटन करू शकत नाही. एआयएडीएमके भाजपासोबत होती. पण त्यांचीही भूमिका सनातन धर्मविरोधी आहे. सनातन धर्म जगभरात कायम राहील. मोदींना सनातन धर्माची चिंता करण्याची काहीही गरज नाही. भाजपानं सनातन धर्माच्या निर्माण व संरक्षणाचा ठेका घेतलेला नाही. इथे शिवसेना बसली आहे. त्यासाठी मोदींची गरज नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“हा निवडणुकीचा मुद्दा नाही. आत्तापर्यंत तुम्हाला सनातन धर्माची चिंता नव्हती. आता अचानक चिंता वाटायला लागली आहे. २०२४ साठी भाजपा व मोदींकडे काहीही मुद्दा नाही. बेरोजगारी, महागाई, चीनची घुसघोरी, जम्मू-काश्मीर, कॅनडाचे आरोप हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण भाजपा सनातन धर्मावरच बोलत आहे”, असंही संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं.
“नार्वेकरांच्या कारकिर्दीत कायद्याची हत्या”
दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्ष्य केलं. “कुणीतरी काल म्हणालं की आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणतोय. दबाव काय असतो? हा सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. आमचा नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बोलतो आहोत. विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार शपथ घेतली आहे. त्याआधी एक वकील म्हणूनही त्यांनी सनद घेताना शपथ घेतली आहे. आमदार म्हणूनही शपथ घेतली आहे. त्यांनी घटनेचं रक्षण करण्याची शपथ घेतली. पण त्यांच्या कारकिर्दीत गेल्या एका वर्षापासून महाराष्ट्रात घटनेचा, कायद्याचा खून होताना मला दिसतोय. त्यावर त्यांना काही वाटत नसेल, तर या विधिमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातलं एक पान त्यांच्या नावाने लिहिलं जाईल”, असं राऊत म्हणाले.
भाजपा उज्ज्वल निकमांना जळगावातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? विद्यमान खासदार उन्मेश पाटील म्हणाले…
“एक बेकायदेशीर सरकार चालवण्यासाठी आपण मदत करत आहात, हे कितपत योग्य आहे याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे.जनतेच्या मनात याविषयी रोष आहे. त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल. या कटात सहभागी असणाऱ्यांना याची किंमत चुकवावी लागेल”, असंही त्यांनी नमूद केलं.
मोदी व भाजपावर टीकास्र
“भाजपाच्या नेतृत्वाखाली सध्याची एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाली त्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. मग त्यांनी लोक गोळा केले व दिल्लीत एनडीए म्हणून बैठक घेतली. कोण आहेत एनडीएमध्ये? शिवसेना, अकाली दल नसेल तर ती एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकदच शिवसेना व अकाली दल होती. बाकीचे लोक येतात आणि जातात. २०२४च्या आधी भाजपाही फुटलेला असेल”, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.